तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचविण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST2021-05-12T04:32:49+5:302021-05-12T04:32:49+5:30
रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के येणार, असे मत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे मुलांना बाधा होऊ नये, यासाठी ...

तिसऱ्या लाटेपासून मुलांना वाचविण्यासाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय
रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट १०० टक्के येणार, असे मत तज्ज्ञांनी वर्तविले आहे. त्यामुळे मुलांना बाधा होऊ नये, यासाठी प्रशासन दक्ष राहणार आहेच. पण जर ती बाधित झाली तर अशांसाठी स्वतंत्र कोविड रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत घेण्यात आला असून, त्यासाठी शहरातील स्वस्तिक रुग्णालयाची निवड करण्यात आली असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी आयोजित केलेल्या ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, दुसऱ्या लाटेनंतर तिसरी लाट येण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला असून, मुलांना याची बाधा होऊ नये, यासाठी प्रशासन काळजी घेईलच. पण ही लाट मुलांपर्यंत पोहोचली तर त्यांना घरगुती स्वरूपात वाटावे, अशा पद्धतीने उपचार हाेतील, त्यात ऑक्सिजन व्यवस्थाही ठेवण्यात येणार आहे. मुलांसाठी हे डी. सी. एच. सी. येथील स्वस्तिक रुग्णालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच अगदी लहान बालके बाधित झाल्यास त्यांच्यासोबत त्यांच्या माता रहाव्यात, यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातूनही असे सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सामंत यांनी सांगितले. यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स करावा, असा निर्णय घेण्यात आला असून, गुरुवारी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्यासमवेत होणाऱ्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही सामंत यांनी सांगितले.
मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ऑनलाईन घेतलेल्या बैठकीत लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला. जिल्ह्यासाठी सुमारे २० हजार कोविशिल्ड तसेच कोव्हॅक्सिन मिळून सुमारे २८ हजार ७०० डोस आले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात २ लाख ६ हजार ६७० लोकांचे लसीकरण झाले आहे. शासनाच्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या धर्तीवर जिल्हा प्रशासनाने सुरू केलेल्या ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ हे अभियान ९ लाख ५७ हजार ६६३ नागरिकांपर्यंत पाेहोचले. त्यातून ७५८ बाधित सापडले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. ज्यांच्यात लक्षणे नाहीत, अशा अनेक व्यक्ती दुसऱ्यांना बाधित करू शकतात. त्यामुळे या अभियानातून अशा व्यक्तींना शोधणे सुरू झाले आहे.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मंगळवारच्या बैठकीत जिल्हा रुग्णालयात नव्याने ६० खाटा तर महिला रुग्णालयात नव्याने १३० ते १४० खाटा वाढविण्याचा निर्णय झाला आहे. ऑक्सिजनचे प्रमाण आणि साठा कमी पडू नये, यासाठी या विभागाचे समन्वयक अमित सैनी यांच्याशी विस्तारित चर्चा झाली. १६ टन आणि ५ टन ऑक्सिजनचा टँकर रायगडमधून निघाला असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी देताना ऑक्सिजनचा साठा कमी पडणार नसल्याची ग्वाही सैनी यांनी दिल्याचे सांगितले.
महिला कोविड रुग्णालय
पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्यासमवेत गुरुवारी विविध विकासकामांसंदर्भात बैठक आयोजित केली आहे. यावेळी इतरही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात येणार आहेत. यावेळी येथील महिला कोविड रुग्णालयाचे उद्घाटनही करण्याचा निर्णय विचाराधीन असल्याची माहिती मंत्री सामंत यांनी यावेळी दिली.