वीजग्राहकांचा एटीपीकडे वाढता कल

By Admin | Updated: September 18, 2015 23:12 IST2015-09-18T22:40:12+5:302015-09-18T23:12:51+5:30

कोकण परिमंडल : आॅगस्टमध्ये सुमारे सव्वाचार कोटीचा महसूल

Increasing trend of electricity consumers of ATP | वीजग्राहकांचा एटीपीकडे वाढता कल

वीजग्राहकांचा एटीपीकडे वाढता कल

रत्नागिरी : वीजबिल भरण्यासाठी रांगेत उभे राहून वेळ घालविण्यापेक्षा एटीपी केंद्रात वीजबिल भरण्याकडे ग्राहकांचा कल वाढला आहे. कोकण परिमंडलातील ३० हजार २६१ ग्राहकांनी एटीपीमध्ये वीजबील भरल्यामुळे आॅगस्टमध्ये तब्बल ४ कोटी २१ लाख २८ हजार ९१३ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. २४ तास एटीपी केंद्र खुले असते, शिवाय सुट्टीदिवशीही एटीपी खुले असल्यामुळे ग्राहकांना वीजबील भरणे सोपे झाले आहे.कोकण परिमंडलात एकूण पाच एटीपी केंद्र आहेत. यापैकी खेड येथील एकमेव एटीपी केंद्र बंद आहे. रत्नागिरी शहरातील ग्राहकांचा एटीपी केंद्रावर वीजबील भरण्याकडे वाढता कल आहे. १० हजार ५ ग्राहकांनी वीजबिल एटीपीमध्ये भरल्यामुळे १ कोटी ६४ लाख २६ हजार ९५२ रूपयांचा महसूल महावितरणला मिळाला आहे. चिपळूण विभागातील ८ हजार ३०६ ग्राहकांनी वीजबील भरल्यामुळे एक कोटी ३६ लाख १४ हजार ८४६ रूपयांचा महसूल मिळाला आहे. खेड येथील एटीपी केंद्र मात्र बंद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २१ हजार ४४२ ग्राहकांनी वीजबिल भरले आहे. त्यामुळे ३ कोटी ३२ लाख १२ हजार ३२५ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन एटीपी केंद्र आहेत. कणकवली केंद्रावर ५ हजार ३५७ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ४६ लाख ३१ हजार २९० रूपयांचा महसूल मिळाला. मालवण केंद्रावर ३ हजार ४६२ ग्राहकांनी वीजबिल भरल्यामुळे ४२ लाख ८५ हजार २९८ रूपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व कणकवली एटीपी केंद्रावर एकूण ८ हजार ८१९ ग्राहकांनी वीजबील भरल्यामुळे ८९ लाख १६ हजार ५८८ रूपयांचा महसूल मिळाला आहे.
कोकण परिमंडलातील रत्नागिरी विभागातून एटीपीकडे ग्राहकांचा कल वाढता आहे. या केंद्रावर ग्राहक वीजबिल भरण्याची संख्या अधिक असल्यामुळे एका महिन्यात सुमारे दोन कोटींचा महसूल रत्नागिरी केंद्रावर मिळाला आहे.
खेड एटीपी केंद्रावर ग्राहकांचा अल्पसा प्रतिसाद असल्यामुळे महावितरणने एटीपी केंद्र बंद केले आहे. रत्नागिरी विभागातील एकमेव एटीपी केंद्रावर ग्राहकांचा प्रतिसाद वाढत असल्यामुळे महावितरणने शहरात आणखी एक एटीपी केंद्रासाठी प्रस्ताव पाठविला आहे. रहाटाघर येथे नवीन उपकेंद्र सुरू करण्यात आले आहे. रहाटाघर येथे नवीन एटीपी केंद्र सुरू करण्यासाठी मंजुरी मिळाल्यानंतर तेथे नवीन एटीपी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. जेणेकरून राजापूर ते संगमेश्वर तालुक्यातील ग्राहक रत्नागिरी शहरात कामासाठी येत असतात.
शहरातील खालच्या भागात जर एटीपी केंद्र उभारले तर खालच्या परिसरातील ग्राहकांना त्याचा लाभ घेता येईल. शिवाय शहरात कामासाठी येणाऱ्या लोकांनाही वीजबील भरणे सोपे होईल. त्यामुळे राहटाघर एटीपी केंद्रास मान्यता मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. (प्रतिनिधी)े

रत्नागिरी विभागातील १३ हजार १३६ ग्राहकांनी नाचणे एटीपी केंद्रावर वीजबिल भरल्याने एक कोटी ९५ लाख ९७ हजार ४७९ रूपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. मालवण व कणकवली एटीपी केंद्रावर ८९ लाख १६ हजार ५८८ रूपयांचा महसूल मिळाला आहे.

Web Title: Increasing trend of electricity consumers of ATP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.