कचऱ्यामुळे वाढते प्रदूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2015 00:02 IST2015-10-12T23:54:42+5:302015-10-13T00:02:43+5:30

रुग्णालयाची बेपर्वाई : शेजारीच जाळला जातो वैद्यकीय कचरा

Increasing pollution through waste | कचऱ्यामुळे वाढते प्रदूषण

कचऱ्यामुळे वाढते प्रदूषण

आवाशी : परशुराम रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालयातील कचरा शेजारीच असणाऱ्या लोटे येथील एका खड्ड्यात जाळला जातो. अनेक दिवसांपासून या घटनेमुळे प्रदूषणासह विविध समस्या निर्माण झाल्या आहेत.
लोटे (ता. खेड) येथे गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पुणे येथील परशुराम रुग्णालय व आयुर्वेदिक महाविद्यालय सुरु आहे. मात्र, येथे प्राथमिक उपचार करुन रुग्णांना अधिक उपचारासाठी चिपळूण, डेरवण वा कराड - कोल्हापूर येथे पाठवले जाते. असे असतानाही छोटे - मोठे उपचार इथे करणाऱ्या या रुग्णालयाची स्वच्छतेबाबतची बोंब आहे. ज्या रुग्णालयामध्ये रुग्णाला व नातेवाईकाला स्वच्छतेबरोबर आरोग्य जपण्याचे काम करणे गरजेचे आहे. त्याच रुग्णालयाचा विविध प्रकारचा कचरा शेजारीच एका खड्ड्यात जाळला जात असल्याने रुग्णालयासह परिसराचे आरोग्य धोक्यात आले आहे.
लोटे औद्योगिक वसाहत परिसरातील वैद्यकीय सेवा देणाऱ्या रुग्णालयांचा कचरा इतरत्र टाकला जाऊ नये. त्याची योग्य विल्हेवाट लावली जावी म्हणून येथील रहिवासी व उद्योजक संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पटवर्धन यांनी अशा कचऱ्यांवर प्रक्रिया करून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी काही वर्षांपूर्वी युनिट स्थापन केले आहे. त्यांची ‘डिस्पोजल व्हॅन’ही हा कचरा गोळा करण्यासाठी फिरत असते. असे असतानाही परशुराम रुग्णालयासारख्या नामांकित रुग्णालयाचा दुर्गंधीयुक्त कचरा त्यांच्याच आवारालगत जाळला जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. हा कचरा जाळला जातो, त्यावेळी त्याठिकाणी धुरामुळे आणि दुर्गंधीमुळे श्वास घेणेही मुश्किल होऊन जाते. याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)


परशुराम रुग्णालय : विविध प्रकारचा कचरा
लॅबमध्ये तपासले जाणारे रक्त, लघवीच्या काचेच्या, प्लास्टिकच्या नळकांड्या, इंजेक्शनच्या सिरीज, सलाईनच्या बाटल्या याचबरोबर औषधांचे बॉक्स व गरोदरपणात तपासली जाणारी नमुन्यांची पट्टी व अन्य औषधयुक्त कचरा या खड्ड्यात दररोज जाळला जातो.

लक्ष देणार का?
प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वाढत्या प्रदुषणाकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत रुग्ण आणि नातेवाईकांकडून व्यक्त होत आहे.

Web Title: Increasing pollution through waste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.