रत्नागिरी : सध्या व्हायरल आजारांमुळे तापसरी, सर्दी - खोकल्याच्या रूग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. रूग्ण वाढल्याने जिल्हा रूग्णालयात रुग्णांना बेड मिळेना झाले आहेत. शासनाच्या मोफत उपचारांमुळे ओपीडीतही चौपटीने वाढ झाली आहे. रूग्णालयाची २०० खाटांची क्षमता असल्याने नव्याने दाखल होणाऱ्या रूग्णांना रूग्णालयाच्या आवारात खाटा ठेवून उपचार करावे लागत आहे. बाह्य कक्षातील रूग्णांमध्ये तब्बल वाढ झाल्याने रूग्णालयाला उपचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.सध्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस जिल्हा रूग्णालयात दाखल होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. जिल्हा रूग्णालयात २०० ते २२० खाटांची सुविधा आहे. मात्र, आता यातही वाढ झाली असून सध्या ३०० रूग्ण दाखल आहेत. त्यात नवीन रूग्णांची भर पउतच आहे. त्यामुळे येणाऱ्या रूग्णांना परिसरात मिळेल तिथे खाट टाकून देत त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.शासनाने सर्वांसाठीच मोफत उपचाराची सुविधा देऊ केल्याने आता जिल्हा रूग्णालयाच्या बाह्य रूग्ण कक्षात २०० ते २५० रूग्ण तपासले जात होते. आता त्यातही जवळपास चाैपटीपेक्षा वाढ झाली असून दर दिवशी ८०० ते ८५० रूग्णांची तपासणी केली जात आहे. एकंदरीत सध्या जिल्हा रूग्णालयाला येणाऱ्या रूग्णांवर उपचार करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
व्हायरल आजारांमुळे रूग्णसंख्येत वाढ, रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात रुग्णांना बेड मिळेनात
By शोभना कांबळे | Updated: October 11, 2023 17:38 IST