आजाराकडे दुर्लक्ष झाल्याने कोरोना मृतांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:31 IST2021-05-23T04:31:07+5:302021-05-23T04:31:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : आजाराकडे होणारे दुर्लक्ष, वेळीच न केली जाणारी चाचणी आणि कोरोनाबाबतची भीती यांमुळे मे महिन्यात ...

Increase in corona deaths due to neglect of the disease | आजाराकडे दुर्लक्ष झाल्याने कोरोना मृतांमध्ये वाढ

आजाराकडे दुर्लक्ष झाल्याने कोरोना मृतांमध्ये वाढ

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : आजाराकडे होणारे दुर्लक्ष, वेळीच न केली जाणारी चाचणी आणि कोरोनाबाबतची भीती यांमुळे मे महिन्यात कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे. मे महिन्याच्या २२ दिवसांत ३९० जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरी लाट झपाट्याने पसरत आहे. मात्र त्याबाबतची बेफिकिरी अजूनही दूर झालेली नाही. त्यातही चाचणी टाळण्याकडे लोकांचा कल असल्यानेच रत्नागिरी जिल्ह्यातील मृतांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.

मार्च महिनाअखेरीस जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या ३७६ होती. एप्रिलअखेर हीच संख्या ६५६ झाली. आता २२ मेपर्यंत ही संख्या १०४६ इतकी झाली आहे. या २२ दिवसांत जिल्ह्यात ३९० मृत्यू झाले आहेत. यात रत्नागिरी आणि चिपळूण हे दोन तालुके आघाडीवर आहेत. त्यातही गेले दोन दिवस ३० पेक्षा अधिक मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत.

मृतांमध्ये ६० वर्षांवरील लोकांची संख्या अधिक असली तरी त्याच वेळी ४० ते ६० या वयोगटातील लोकही त्यात आहेत आणि काही तरुणांचाही त्यात समावेश आहे. त्यामुळे याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.

...................

काय आहेत कारणे

१. आजारपणाकडे होणारे दुर्लक्ष

सर्दी, खोकला किंवा ताप असतानाही तो अंगावर काढण्याचे प्रमाण अधिक आहे. त्याची तपासणी तत्काळ करून घेण्याचे प्रमाण खूप कमी आहे. आजार बळावल्यानंतर लोक तपासणीला येतात आणि तोपर्यंत आजार फुप्फुसापर्यंत पोहोचतो. उशिराने सुरू झालेले उपचार हे यातील प्रमुख कारण आहे.

२. ग्रामीण भागात जवळजवळ निम्म्या घरांमध्ये वृद्ध दाम्पत्यच राहते. मुले, सुना, नातवंडे शहरात असतात. अशा वृद्धांना होणाऱ्या आजारांकडे तत्काळ लक्ष दिले जात नाही. ही वृद्ध माणसे आधी घरगुती उपचार करतात. मग आजार बरा होत नाही म्हणून रुग्णालयात जातात आणि नंतर कोरोना चाचणी होते. त्यात उपचारांना उशीर होतो.

३. कोरोना झाल्याचे समजल्यानंतर मानसिकदृष्ट्या लोक खचून जातात. त्यामुळे प्रतिकारक शक्ती वाढत नाही. अशा वेळी सकारात्मक विचारांचे बळ रुग्णाला मोठे आधार देते. मात्र कोरोनाच्या भीतीने रुग्ण दगावतात, हेही त्यातील एक महत्त्वाचे कारण आहे.

..............................

रुग्णांशी थेट संपर्क

सर्दी, ताप, खोकला असलेले रुग्ण जर खासगी डॉक्टरांकडे गेले तर त्याची माहिती त्याच दिवशी त्या डॉक्टरांकडून आरोग्य यंत्रणेला दिला जात आहे. आता यावर अधिक लक्ष दिले जात आहे. त्या त्या भागांतील आरोग्य यंत्रणेकडून अशा रुग्णांशी सतत संपर्क साधला जाणार आहे. त्यांचा आजार कमी झाला की नाही, याची माहिती घेतली जाणार आहे. जर आजार कमी झाला नसेल तर त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्यातून रुग्ण लवकर समोर येतील. अशा किती रुग्णांशी संपर्क झाला, याबाबतची माहिती दररोज जिल्हा कार्यालयाकडून तालुका पातळीवर विचारली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

.........................

सर्दी, ताप, खोकला किंवा अशक्तपणा यांबाबतचा कोणताही आजार असलेल्या रुग्णांनी आजाराच्या अगदी पहिल्या दिवशीच कोरोना चाचणी करुन घ्यावी. जर चाचणी पॉझिटिव्ह आली तर त्यावर लगेचच विनाविलंब उपचार होऊ शकतात. या लक्षणांचे आजार अंगावर काढू नयेत किंवा त्याकडे दुर्लक्षही केले जाऊ नये.

- डॉ. बबिता कमलापूरकर

जिल्हा आरोग्याधिकारी, रत्नागिरी

Web Title: Increase in corona deaths due to neglect of the disease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.