व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरेश प्रभूंकडून ‘विज्ञान एक्स्प्रेस’चे उद्घाटन
By Admin | Updated: July 15, 2017 15:45 IST2017-07-15T15:45:46+5:302017-07-15T15:45:46+5:30
रत्नागिरीत ट्रॅकवर उभ्या असलेल्या १६ बोगीच्या रेल्वेमध्ये प्रदर्शन सुरू

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुरेश प्रभूंकडून ‘विज्ञान एक्स्प्रेस’चे उद्घाटन
आॅनलाईन लोकमत
रत्नागिरी (जि. रत्नागिरी), दि. १५ : भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागातर्फे रत्नागिरी स्थानकात आलेल्या ‘सायन्स एक्सप्रेस’मधील विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले. त्यानंतर पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते खासदार विनायक राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीत या सायन्स एक्सप्रेसचे फीत कापून औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर ३वरील ट्रॅकवर उभ्या असलेल्या १६ बोगीच्या रेल्वेमध्ये हे विज्ञान प्रदर्शन सुरू झाले आहे. यावेळी झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाला कोकण रेल्वेचे रत्नागिरी क्षेत्रीय प्रबंधक बाळासाहेब निकम, जिल्हा परिषद अध्यक्षा स्नेहा सावंत, रत्नागिरीचे नगराध्यक्ष राहुल पंडित, जिल्हाधिकारी प्रदीप पी., पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक, रत्नागिरी तालुकाप्रमुख बंड्या साळवी, सेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय साळवी, रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्घाटन केल्यानंतर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, पर्यावरण बदलावर जगभरात मोठ्या प्रमाणात उपाययोजना सुरू आहेत. यासाठी स्थानिक पातळीवरही प्रयत्न होणे गरजेचे असून, त्याचे मार्गदर्शन होण्यासाठीच रेल्वेमधील विज्ञान प्रदर्शन हा उपक्रम देशभरात राबविला जात आहे. पालकमंत्री रवींद्र वायकर म्हणाले, दहा वर्षांपूर्वी सायन्स एक्सप्रेस रत्नागिरीत आली होती. त्यानंतरच्या काळात पर्यावरणात मोठे बदल झाले आहेत. त्यामुळेच यावेळी या सायन्स एक्सप्रेसमधील प्रदर्शनात पर्यावरणातील बदलाची माहिती व त्यावरील उपाययोजना, पर्यावरणातील बदलाशी सुसंगतपणा कसा आणावा, याची माहिती सर्वांना मिळणार आहे. १४ ते १६ जुलैपर्यंत तीन दिवस रोज सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना पाहता येणार आहे. शाळांमधील विद्यार्थी, रेल्वे प्रवासी यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.