खेडमध्ये निराधार योजनाच ‘निराधार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2015 00:30 IST2015-07-05T21:39:00+5:302015-07-06T00:30:47+5:30
लाभार्थीच नाहीत : योजनांच्या अंमलबजावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज...

खेडमध्ये निराधार योजनाच ‘निराधार’
खेड : निराधार व्यक्तींना आधारभूत अर्थसहाय करणाऱ्या शासनाच्या विषेश योजना निराधारांना सहायभूत ठरत आहेत. निराधारांचे आणि विधवांचे जीवनमान उंचावे, याकरिता राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध योजना सध्या कार्यरत आहेत़ २०१४ - २०१५ या आर्थिक वर्षात राष्ट्रीय कुटुंबकल्याण योजनेने जिल्ह्यातील ७९३ कुटुंबांना न्याय मिळवून दिला. खेडमध्ये केवळ ६ लाभार्थी असून, सर्वाधिक ३० लाभार्थी संगमेश्वरमध्ये आहेत. जिल्हा कार्यालयाकडून तब्बल ६७६ कुटुंबांना या योजनेअंतर्गत अर्थिक मदत मिळवून देण्यात आली. ही आकडेवारी समाधाकारक नाही. याकरिता शासन व सामाजिक स्तरावर अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
निराधार घटकांसाठी शासनाच्या संजय गांधी निराधार योेजना विभागाच्या वतीने मासिक लाभाच्या विषेश योजना राबविण्यात येतात. त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कृटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येतात. यापैकी राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला २० हजार रूपये अर्थसहाय देण्यात येते. या ६ योजनांचा लाभ जिल्ह्यातील अनेक निराधारांना मिळत आहे़ प्रशासनाच्या विशेष प्रयत्नांमुळे २०१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील ७९३ निराधार कुटुंबांना या योजनेचा आधार मिळाला. या विविध योजनांच्या अंमलबजावणीसाठी चांगले प्रयत्न झाल्यास याचा लाभ सर्वसामान्याना होणार आहे. अर्थात यासाठी ग्रामीण स्तरावरून विषेश प्रयत्न होणे अपेक्षित आहे. (प्रतिनिधी)