मुख्याधिकाऱ्यांचा युतीला ‘दे धक्का’
By Admin | Updated: July 11, 2014 00:04 IST2014-07-10T23:52:45+5:302014-07-11T00:04:44+5:30
रत्नागिरी पालिका : व्यापारी गाळ्यांचे काढले सील

मुख्याधिकाऱ्यांचा युतीला ‘दे धक्का’
रत्नागिरी : रत्नागिरी नगरपालिकेने सील केलेल्या स्वमालकीच्या १२ पैकी १० व्यापारी गाळ्यांचे सील (बुधवारी) सायंकाळी उशिरा मालमत्ता विभागाने काढले. या गाळेधारकांकडून केवळ २५ टक्के अर्थात ३७ लाख ८५ हजार थकबाकीची रोखीत वसुली झाली आहे. पूर्ण थकबाकी भरल्याशिवाय गाळ्यांचा ताबा देऊ नये, अशी सत्ताधारी महायुतीची मागणी धुडकावत सत्ताधाऱ्यांच्या नाकावर टिच्चून मुख्याधिकारी रंजना गगे यांनी हा निर्णय घेतला. त्यामुळे मुख्याधिकारी व महायुती यांच्यात कलगी-तुरा रंगला आहे. सेना-भाजप महायुती याबाबतची आपली भूमिका शुक्रवारी जाहीर करणार असल्याचे भाजप गटनेते अशोक मयेकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममधील पालिकेच्या १२ गाळ्यांचे पावणेदोन कोटी रुपये भाडे गेल्या ३० वर्षांपासून थकीत आहे. त्यामुळे २ जुलै रोजी हे १२ गाळे पालिकेने सील केले होते. किती रक्कम स्वीकारून गाळ्यांचे सील काढावे, हा आपला अधिकार असल्याचे गगे यांनी सुनावले होते. मुख्याधिकारी गगे यांनी मालमत्ता विभागाला दिलेल्या आदेशानुसार कोणताही गाजावाजा न करता बुधवारी सायंकाळी उशिराने १० गाळ्यांचे सील काढून ते संबंधित भाडेकरूंच्या ताब्यात देण्यात आले. १२पैकी १० गाळेधारकांकडून २५ टक्के अर्थात ३७ लाख ८५ हजार एवढी थकबाकी स्वीकारण्यात आली आहे.
थकबाकीचा २५ टक्के रकमेचा दुसरा हप्ता म्हणून त्या रकमेचे १९ व २० आॅगस्ट २०१४ या तारखेचे धनादेश प्रत्येक गाळेधारकाकडून घेण्यात आले आहेत. उर्वरित ५० टक्के रक्कमही डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्णत: भरावयाची असून, त्यासाठीचे हप्तेवजा धनादेशही स्वीकारण्यात आले आहेत. हे धनादेश बॅँकेत वटले नाहीत तर पालिका जी कारवाई करील ती मान्य असेल, असे १०० रुपयांच्या बॉन्डवर या दहा जणांनी लिहून दिले आहे. ५० लाख थकीत घरपट्टीचे धनादेशही पालिकेने स्वीकारले. (प्रतिनिधी)