रत्नागिरी : गणेश चतुर्थीला जिल्ह्यात १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना १० सप्टेंबर रोजी करण्यात आली होती. गेले पाच दिवस उत्साहात साजऱ्या करण्यात येणाऱ्या उत्सवाची सांगता १४ सप्टेंबर रोजी होणार आहे. जिल्ह्यातील एक लाख १७ हजार २१३ घरगुती व १९ सार्वजनिक गणेशमूर्तींबरोबर गौरींचेही विसर्जन केले जाणार आहे.
जिल्ह्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो. यात घरगुती गणेशोत्सवाचे प्रमाण सर्वाधिक आहे. दीड दिवसाच्या १८ सार्वजनिक व १२ हजार ३३४ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ११ रोजी करण्यात आले होते. काही भाविक दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस (वामनद्वादशी), दहा दिवस (अनंत चतुर्दशी), अकरा, बारा, सोळा व एकवीस दिवस गणेशमूर्तींचे पूजन करतात. पाचव्या दिवशी गौरीसमवेत विसर्जन करणाऱ्या गणेशमूर्तींची संख्या मात्र जिल्ह्यात सर्वाधिक आहे.
रत्नागिरी शहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत ५,८२५ व ग्रामीण पोलीस स्थानक हद्दीत ७,६९९ घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. जयगड येथे १,७६६, संगमेश्वरमध्ये ९ हजार १८३, राजापुरात ११ हजार ४६९, नाटेत ६ हजार १८७, लांजा येथे ११ हजार ७४०, देवरूख ८ हजार १७०, सावर्डेत ९ हजार ३२२, चिपळूण ९ हजार ७८५, गुहागर ९ हजार १५०, अलोरे ५ हजार ३००, खेड येथे १० हजार ६३२, दापोलीत २५००, मंडणगडात ३ हजार ५६, बाणकोटमध्ये ३९५, पूर्णगडमध्ये ३ हजार ७७६, दाभोळमध्ये १२५८ घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे.
कोरोनामुळे प्रशासनाकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. शिवाय मिरवणुकांनाही बंदी घालण्यात आली आहे. शक्यतो घराशेजारील विहिरी, पिंप, तलाव यामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाची सूचना करण्यात आली आहे. शहरातील भाविकांसाठी नगर परिषदेतर्फे विसर्जनासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शहरात माळनाका उद्यान, लक्ष्मी चौक उद्यान, नूतननगर उद्यान, विश्वनगर उद्यान या ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय घराबाहेर विसर्जनासाठी बाहेर न पडणाऱ्या नागरिकांकडील गणेशमूर्तींचे घरोघरी जाऊन संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरिकांना परिषदेच्या हेल्पलाइन (०२३५२-२२२३१० किंवा ०२३५२-२२२१४४) क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांतर्फे मांडवी किनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली असून, रत्नागिरी शहराबरोबर जिल्ह्यातील अन्य विविध विसर्जन घाटांची सफाई ग्रामस्थ, स्थानिक मंडळातर्फे करण्यात आली.
.....................
४११ विसर्जन स्थळे
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ४११ विसर्जनस्थळे आहेत. मंडणगड तालुक्यात ३८, दापोली ५५, खेड ४८, गुहागर ५३, चिपळूण ४५, संगमेश्वर ३२, रत्नागिरी ५९, लांजा ३२, राजापूर ४९ विसर्जन घाट आहेत. याशिवाय शहरांमध्ये नगर परिषदांतर्फे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. ग्रामपंचायत अखत्यारीतील विसर्जन घाटावरील जबाबदारी पोलीस पाटील व ग्रामसेवकांवर सुपुर्द करण्यात आली आहे. शिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.