सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी विसर्जनाची सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:29 IST2021-09-13T04:29:19+5:302021-09-13T04:29:19+5:30
रत्नागिरी : वर्षभर आतुरता लागून राहिलेल्या गणपत्तीबाप्पांची प्रतिष्ठापना दि. १० सप्टेंबर रोजी सर्वत्र झाली. जिल्हाभरात १ लाख ...

सोशल डिस्टन्सिंग राखण्यासाठी विसर्जनाची सुविधा
रत्नागिरी : वर्षभर आतुरता लागून राहिलेल्या गणपत्तीबाप्पांची प्रतिष्ठापना दि. १० सप्टेंबर रोजी सर्वत्र झाली. जिल्हाभरात १ लाख ६६ हजार ५३९ घरगुती तर १०८ सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विसर्जनासाठीचे घाट निश्चित असल्याने त्याठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शक्यतो घरीच बादली किंवा पिंपात गणेशमूर्ती विसर्जनाचे आवाहन केले आहे. काही स्थानिक स्वराज्य संस्थांनी तर कृत्रिम तलावांची व्यवस्था केली आहे.
शनिवारी दुपारनंतर दीड दिवसांच्या गणेशमूर्तींना निरोप देण्यात आला. जिल्ह्यातील १८ सार्वजनिक व १२ हजार ३३४ खासगी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गौरीसह गणपतींचे पाचव्या दिवशी विसर्जन होणार आहे. यादिवशी जिल्ह्यातील एक लाख १७ हजार २१३ घरगुती व १९ सार्वजनिक गणेशमूर्तींचे विसर्जन होणार आहे. वर्षानुवर्षे गणेशमूर्ती विसर्जनाचे घाट निश्चित असल्याने त्याठिकाणी प्रचंड गर्दी होते. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने पिंप किंवा बादलीत गणेशमूर्तीचे विसर्जन करून मूर्ती विरघळल्यानंतर ते पाणी झाडांना घालावे, असे आवाहन केले आहे.
शहरात गणेशमूर्तींची संख्या अधिक आहे. रत्नागिरी शहरात ७,९११ घरगुती तर रत्नागिरी ग्रामीणमध्ये ९,४३८ घरगुती गणपतींचे विसर्जन होणार आहे. शहरातील नागरिकांसाठी लक्ष्मी चौक उद्यान, माळ नाका उद्यान, नूतन नगर उद्यान, विश्व नगर उद्यान याठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत.
याशिवाय विसर्जनासाठी बाहेर न पडणाऱ्या नागरिकांकडील गणेशमूर्तींचे घरोघरी जाऊन संकलन करण्यात येणार आहे. त्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेच्या ०२३५२ - २२२३१० किंवा ०२३५२ - २२२१४४ या क्रमांकावर संपर्क साधून नोंदणी करण्याचे आवाहन नगर परिषदेने केले आहे.
-------------------------
माेजक्याच लाेकांनी उपस्थित राहावे
ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांनीही विसर्जन घाटावरील गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी प्रत्येक गावातील वाडीसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. मिरवणुकांना तर बंदीच आहे. शिवाय घरातील मोजक्या तीन ते चार व्यक्तींनीच जाऊन गणेशमूूर्तीचे विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सिंग राखण्याबरोबर मास्क वापरण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. शासनाच्या नियमांचे पालन स्थानिक जनतेने करावे, यासाठी गावपातळीवरील ग्राम कृती दलेही कार्यरत आहेत.