खाण्याचा साेडा वापरुन घरीच करा गणेशमूर्तींचे विसर्जन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:33 IST2021-09-03T04:33:24+5:302021-09-03T04:33:24+5:30
अरुण आडिवरेकर लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : वाहतुकीला साेपी आणि कमी किमतीत आकर्षक मूर्ती उपलब्ध हाेत असल्याने प्लास्टर ऑफ ...

खाण्याचा साेडा वापरुन घरीच करा गणेशमूर्तींचे विसर्जन
अरुण आडिवरेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : वाहतुकीला साेपी आणि कमी किमतीत आकर्षक मूर्ती उपलब्ध हाेत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी)च्या मूर्तींना अधिक पसंती मिळत आहे. या मूर्ती विरघळण्याची प्रक्रिया उशिराने हाेत असल्याने मूर्ती वापराला विराेध हाेत आहे. मात्र, पाण्यात विशिष्ठ प्रमाणात खाण्याचा साेडा टाकल्यास या मूर्ती विरघळण्याची प्रक्रिया लवकर हाेते आणि या पाण्याचा खत म्हणूनही वापर करता येऊ शकताे.
शाडूच्या मूर्तींचे दर जास्त असल्याने अनेकजण पीओपीच्या मूर्ती खरेदी करतात. या मूर्तींचे विसर्जन करताना पाण्यात खाण्याचा साेडा टाकल्यास मूर्ती विरघळण्याची प्रक्रिया लवकर हाेते. मात्र, हे छाेट्या मूर्तींसाठी फायदेशीर ठरू शकते. माेठ्या मूर्तींवर प्रक्रिया उशिरानेच हाेते. या मूर्तींमध्ये काथ्याचे प्रमाण अधिक असल्याने त्याचा अंश तसाच राहताे.
पीओपीला पसंती
पीओपीच्या मूर्तीं आकर्षक असल्याने दरवर्षी या मूर्तींना वाढती मागणी आहे. जिल्ह्यातील मूर्तीशाळांमध्ये ७० टक्के पसंती पीओपींच्या मूर्तींना असते. जिल्ह्यात १२५ गणेश मूर्तीशाळा असून, १० ते १२ हजार पीओपीच्या मूर्तींची विक्री हाेते तर ६ ते ७ हजार इतक्या शाडूच्या मूर्ती नेल्या जातात.
४८ तासांत विरघळते मूर्ती
प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात लवकर विरघळत नाही. त्यामुळे ही मूर्ती प्रदूषणाला धाेकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही मूर्ती पाण्यात विरघळण्यासाठी खाण्याचा साेडा वापरल्यास साधारणत: ४८ तासांत मूर्ती विरघळते. पण हे माेठ्या मूर्तींसाठी उपयुक्त नसून, केवळ दीड फुटाच्या मूर्तींसाठी याेग्य ठरू शकेल.
मातीचा दर परवडत नाही. साधारणत: २ फुटाच्या साच्याला साडेतीन हजार रुपये माेजावे लागतात. त्यानंतर माती काम, फिनिशिंग, रंग याचा ताळमेळ बघता पीओपीपेक्षा दुप्पट दर असताे. त्यामुळे अनेकजण पीओपीच्या मूर्ती घेतात. या मूर्ती आता विरघळण्यासाठी खाण्याचा साेडा वापरण्याचा पर्याय दिला आहे. मात्र, तो लहान मूर्तींसाठी याेग्य आहे.
- मंदार शिवलकर, संगमेश्वर