वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:29 IST2021-03-24T04:29:00+5:302021-03-24T04:29:00+5:30
चिपळूण : चिपळूण तसेच संगमेश्वर तालुक्यांतील अनेक भागांमध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या महिन्यापासून कुचांबे, कुंभारखणी, आरवली, माखजन ...

वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
चिपळूण : चिपळूण तसेच संगमेश्वर तालुक्यांतील अनेक भागांमध्ये वृक्षतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. गेल्या महिन्यापासून कुचांबे, कुंभारखणी, आरवली, माखजन आदी भागात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केली जात आहे. वनविभागाची कोणतीही परवानगी न घेता ही वृक्षतोड केली जात आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
प्लास्टिक पिशव्यांची विक्री
रत्नागिरी : रत्नागिरीसह महाराष्ट्रात प्लास्टिक पिशव्यांना बंदी घालण्यात आली आहे. कमी मायक्रोनच्या पिशव्या विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत. मात्र, जिल्ह्यातील काही व्यावसायिकांकडून कमी जाडीच्या पिशव्या वापरल्या जात असून त्यावर व्यावसायिकांकडून स्वत:चे नाव आणि दुकानाचे नाव घालून दिले जात आहे. मात्र, त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही.
रस्त्याचे काम रखडलेलेच
खेड : खोपी शिरगावचा जवळपास १० किलोमीटरचा रस्ता शासनाच्या मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर करण्यात आला आहे. तसा फलकही धामणंद फाट्यावर लावण्यात आला आहे. मात्र, या रस्त्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले आहे. या मार्गावरील सुमारे ३६ मोऱ्या आणि ४० फुटी नाले अजूनही बांधकामाच्या प्रतीक्षेत आहेत.
शाळांची दुरुस्ती रखडली
दापोली : जून महिन्यात झालेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील अनेक घरांबरोबरच जिल्हा परिषदेच्या शाळांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. काही शाळांचे छत मोडल्याने संगणक व इतर साहित्याचेही नुकसान झाले. भिंतींना तडे गेले होते. त्यामुळे या शाळा धोकादायक बनल्या आहेत. परंतु या शाळांची दुरुस्ती रखडली आहे.
विविध पुलांची कामे
रत्नागिरी : तालुक्यातील विविध पुलांची कामे मंजूर झाली असून लवकरच निधीही उपलब्ध होणार आहे. यात कर्ला, जुवे, खरवते, हातीस, तोणदे आदी पुलांचा समावेश आहे. कर्ला - जुवे पुलासाठी १ कोटी १८ लाख, खरवते पुलासाठी ८० लाख तर हातीस - तोणदे पुलासाठी ८ कोटी रुपये एवढा निधी मंजूर होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.
लेखन स्पर्धा
मंडणगड : मंडणगड विद्यार्थी मदत संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त गडकिल्ल्यांची माहिती व लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचा निकाल नुकताच लागला आहे. लहान गटात आर्यन बोर्ले, ओंकार गोरड आणि वैष्णव कांबळे यांनी पहिले तीन क्रमांक पटकावले. तर मोठ्या गटात अविष्कार लवटे, प्रणित गोणबरे, अथर्व ढवळे यांनी पहिले तीन क्रमांक मिळविले.
भरपाईची मागणी
खेड : अवकाळी पावसाने तालुक्यातील आंबा आणि काजू पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात झालेल्या या पावसाने मोठेच नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी किटकनाशके, खते मोठ्या प्रमाणावर खरेदी केली होती. मात्र तरीही मोहर आणि फळे गळून पडली आहेत. त्यामुळे सर्वेक्षण करुन शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
कचऱ्याकडे दुर्लक्ष
रत्नागिरी : शहरातील ओसवालनगर परिसरातील नागरिक रस्त्यावरच कचरा टाकत असल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. ग्रामपंचायतीने सूचना फलक लावूनही कचरा टाकला जात असून यावर मोकाट जनावरे व श्वान ताव मारत आहेत. या मार्गावरून येजा करणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
खुलेआम गुटखा विक्री
रत्नागिरी : राज्यात उत्पादन व विक्रीला बंदी असतानाही गुटख्याची विक्री राजरोसपणे सुरू आहे. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये तेथील टपऱ्यांवरही गुटखा सहजपणे उपलब्ध होत आहे. परराज्यातून गुटखा जिल्ह्यात आणला जात असतानाही त्यावर कोणतीही कारवाई अद्यापपर्यंत झालेली नाही. त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मोकाट श्वानांचा उपद्रव
रत्नागिरी : शहरातील साळवीस्टाॅप, मारूतीमंदिर, सन्मित्रनगर, जेलरोड व अन्य भागांमध्येही गेल्या काही दिवसांपासून मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला आहे. हे मोकाट श्वान अंगावर धावून येत असल्याने नागरिकांनी त्याचा धसका घेतला आहे. रात्रीच्या वेळी रस्त्याने जाणेही धोकादायक बनले. वाहनांचाही श्वान पाठलाग करतात. त्यामुळे मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.