शिवतरच्या नशिबी दुर्लक्षच
By Admin | Updated: October 13, 2015 00:12 IST2015-10-12T21:28:12+5:302015-10-13T00:12:59+5:30
खेड तालुका : राज्य सरकारच्या पुढाकाराची गरज

शिवतरच्या नशिबी दुर्लक्षच
श्रीकांत चाळके-- खेड--पहिल्या आणि दुसऱ्या महायुध्दामध्ये धारातिर्थी पडलेल्या शिवतर येथील २३४ जवानांच्या स्मरणाचा राज्य सरकारला विसर पडला आहे़ या गावातील धारातिर्थी पडलेल्या जवानांचे स्मरण व्हावे म्हणून इंग्रज सरकारने या गावामध्ये उभारलेला रणस्तंभ हाच या कर्तबगार जवांनाच्या शौर्याची साक्ष देत आहे़
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दोन वर्षांपूर्वी दिलेल्या १५ लाख रूपये खर्चातून या रणस्तंभाची डागडुजी करण्यात आली. याकरिता रामदास कदम यांनीच विशेष प्रयत्न केले होते. दोन्ही युध्दामध्ये अतुल शौर्य दाखविणारा शिवतर गाव तसा विविध सुविधांपासून वंचितच राहिला आहे. या गावाला फौजी गावचा दर्जा मिळाल्यास हा गाव सुजलाम् सुफलाम् होणार आहे़ मात्र, याकामी आता राज्य सरकारनेच पुढाकार घेतल्यास दोन्ही युध्दामध्ये रक्त सांडलेल्या जवानांनी केलेल्या प्रयत्नांचे खऱ्या अर्थाने चीज होणार आहे़
या गावातील आजी आणि माजी जवानांनी शिवतर गावाला केंद्राकडून निधी प्राप्त होण्यासाठी वारंवार प्रयत्न केले आहेत़ मात्र, त्यामध्ये त्यांना यश आले नाही़ आतापर्यंतच्या सर्वच आमदार तसेच लोकप्रतिनिधींनी आणि समाजोपयोगी कामाचा टेंभा मिरवणाऱ्यांनी याकडे हेतूपुरस्सर दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे. येथील रणस्तंभ हाच येथील जवानांच्या पराक्रमाची साक्ष देत उभा आहे़ हा रणस्तंभदेखील दुर्लक्षित होता. मात्र, रामदास कदम यांनी दिवंगत सैनिकांच्या अतुल शौर्याला सलाम करीत मातृभूमीप्रती दाखवलेल्या औदार्याबद्दल येथील जवान कृतार्थ झाले आहेत. आता दुर्लक्षित राहिलेल्या शिवतर गावचे ‘फौजी शिवतर’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करावे, असे या जवानांना वाटते. राज्य सरकारने याकडे कटाक्षाने लक्ष घालावे, अशी मागणीदेखील यानिमित्ताने या जवानांनी केली आहे. शिवतर गाव हा संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासह महाराष्ट्राची शान आहे. संपूर्ण भारतात शिवतर गावाची फौजी म्हणूनच स्वतंत्र ओळख आहे़ ब्रिटिशांच्या काळात याच गावातील शेकडो जवांनानी आपल्या मातृभूमीप्रती बलिदान दिले आहे.
महाराष्टा्रतील एवढ्या मोठ्या प्रमाणात बलिदान दिलेल्या जवानांचे हे एकमेव गाव आहे. मात्र, या बदल्यात गावामध्ये माजी सैनिकांच्या तसेच त्यांच्या पाल्यांच्या कल्याणार्थ कोणतीही विकासकामे झाली नाहीत. जवानांसाठी आरोग्यदृष्ट्या कोणतीही सुविधा या सैनिकांच्या गावामध्ये उपलब्ध नाही. शिक्षण आणि सामाजिक बांधिलकीपासून हे गाव अद्याप कोसो अंतर दूर आहे. खेड शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव आजही अत्यावश्यक सुविधांच्या प्रतीक्षेत आहे़ याकरिता आता राज्य सरकारने पुढाकार घ्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे.
मागणी : ‘फौजी शिवतर’चा प्रस्ताव
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील आंबवडे गावाचे नुकतेच ‘फौजी आंबवडे’ असे नामकरण करून भारत सरकारने येथील धारातिर्थी पडलेल्या जवानांना दोन वर्षांपूर्वी न्याय मिळवून दिला आहे़ याच धर्तीवर शिवतर गावाचे ‘‘फौजी शिवतर’’ असे नामकरण करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़
अपुरी माहिती
रणस्तंभावर २३४पैकी केवळ १८ जवानांची नावे आहेत़ उर्वरित जवानांची येथील सैनिकांच्या नातेवाईकांना अद्याप माहिती नाही.