दापोली : येथील उपजिल्हा रुग्णालयाचे बराच काळ रखडले असल्याने राज्यमंत्री योगेश कदम चांगलेच संतापले. जनतेची कामे करायची नसतील तर राजीनामा देऊन घरीच बसा, अशा शब्दांत त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सुनावले.५० बेडच्या या हॉस्पिटलचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले होते. मात्र, दिरंगाईमुळे अजूनही कामात पुरेसे पुढे गेलेले नाही. सोमवारी दापोली दौऱ्यावर आलेल्या राज्यमंत्री कदम यांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी या कामातील दिरंगाई त्यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले.मंजुरी मिळाल्यानंतर ड्रॉइंग मिळण्यासाठी आठ महिने लागल्याने पुढील कामाला विलंब झाल्याचे कारण बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. मात्र, मला कारणे देऊ नका, एकाच वेळी भूमिपूजन झालेली जिल्ह्यातील अनेक कामे पूर्णत्वास गेली, मग याच कामाला विलंब का झाला, असा प्रश्न मंत्री कदम यांनी केला. निधी आणताना आमची कसरत होते. जनतेसाठी विकास कामांसाठी आम्ही निधी आणतो. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार अशा पद्धतीने कामे करणार असतील तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही. हा आपला शेवटचा इशारा असेल, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.ठेकेदाराकडून कसे काम करून घ्यायचे, तो तुमचा अधिकार आहे. मला यापुढे कारण चालणार नाही, असे ते म्हणाले. आरसीसी डिझाइन मिळण्यासाठी आठ महिने लागल्याने योगेश कदम यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याशी साधला संवाद साधला. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्याची विनंतीही त्यांनी केली.
जनतेची कामे करायची नसतील तर घरीच बसा, मंत्री योगेश कदम यांनी बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना सुनावले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:38 IST