वळण न काढल्यास रस्ता मृत्यूचा सापळा

By Admin | Updated: September 4, 2015 22:34 IST2015-09-04T22:34:12+5:302015-09-04T22:34:12+5:30

शुभांगी गोवेकर आक्रमक : बांधकाम विभागाला विचारला जाब

If the road is not closed, road passage trap | वळण न काढल्यास रस्ता मृत्यूचा सापळा

वळण न काढल्यास रस्ता मृत्यूचा सापळा

सावंतवाडी : सातार्डा - सातोसे रस्ता गरज नसताना केला आहे. मात्र, सातार्डाच्या जवळ असलेल्या वळणामुळे भविष्यात अनेकांना आपले जीव गमवावे लागणार आहेत. तुम्ही तेव्हा काय करणार याचे उत्तर मला द्या, असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्या शुभांगी गोवेकर यांनी सभापती प्रमोद सावंत यांच्या समक्ष जिल्हा परिषद बांधकाम विभागाला विचारला. त्यावर बांधकाम विभागाने कंपनीकडून लेखी पत्र घेतो असे उत्तर सभापतींना दिले. त्यानंतर या विषयावर पडदा पडला.
सातार्डा - सातोसे रस्त्याबाबतची तक्रार सदस्या शुभांगी गोवेकर यांनी पंचायत समितीकडे केली होती. सभेनंतर सदस्या शुभांगी गोवेकर यांनी हा विषय पुढे नेत मी यापूर्वी अनेकदा तक्रार केली पण त्यावर मला योग्य ते उत्तर मिळत नाही, अशी खंत व्यक्त केली. हा रस्ता मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंग व कार्यकारी अभियंता साळोखे यांनी पाहिला आहे. अशी उत्तरे दिली जातात. त्यांनी रस्ता बघितला म्हणजे आम्हाला तेथे काय किंमत नाही का? असा सवाल गोवेकर यांनी केला.
त्यावर सभापती प्रमोद सावंत यांनी या रस्त्याचे काय झाले ते सभागृहाला सांगा असे प्रभारी उपविभागीय अभियंता राजन पाटील यांना विचारले. त्यावर पाटील यांनी काम पूर्ण झाले असून, किरकोळ त्रुटी असल्याचे स्पष्ट केले. तर शाखा अभियंता व्ही. एस. चव्हाण यांनी सांगितले की, ते वळण काढून टाकण्यात यावे असे कंपनीला कळविण्यात आले आहे. त्यावर सभापती सावंत यांनी सभागृहाला काय झाले ते कळले पाहिजे असे सांगितले. वळण काढण्याबाबत लेखी द्या म्हणजे आमच्याकडे पुरावा राहिल. अन्यथा आम्ही याचा पाठपुरावा करु शकणार नाही असे स्पष्ट केले. अखेर शाखा अभियंता चव्हाण यांच्या उत्तराने या विषयावर पडदा पडला. (प्रतिनिधी)

कामातील त्रुटीमुळे १ कोटी जिल्हा परिषदकडे ठेवले
सातार्डा- सातोसे रस्त्याच्या कामात अनेक त्रुटी असल्याने तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठणकर यांच्या तक्रारीमुळे अखेर जिल्हा परिषदने रस्त्याचे पूर्ण बिल न करता १ कोटी रूपयांची कपात करत हा निधी आपल्याकडे ठेवला आहे. सातार्डा ते सातोसे सव्वा चार किलोमीटरचा हा रस्ता ४ कोटी १६ लाख रूपयांना मंजूर झाला होता. आता रस्त्याचे उर्वरित काम पावसाळ्यानंतर पूर्ण केल्यानंतर हा निधी दिला जाणार आहे. असे जिल्हा परिषदेच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: If the road is not closed, road passage trap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.