माेफत धान्याचा लाभ आणखी पाच महिने मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:22 IST2021-07-01T04:22:38+5:302021-07-01T04:22:38+5:30

रत्नागिरी : देशातील जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या या कठीण प्रसंगाच्या अनुषंगाने ...

I will get the benefit of free grain for another five months | माेफत धान्याचा लाभ आणखी पाच महिने मिळणार

माेफत धान्याचा लाभ आणखी पाच महिने मिळणार

रत्नागिरी : देशातील जनतेला कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. सामान्य जनतेच्या या कठीण प्रसंगाच्या अनुषंगाने प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ जुलै ते नोव्हेंबर असे पाच महिने वाढवून देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी एश्वर्या काळुसे यांनी दिली. रत्नागिरी जिल्ह्यातील ११ लाख ६९ हजार २०७ लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेबरोबरच या मोफत पाच किलो धान्याचा लाभ मिळत आहे.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिमाह प्रतिसदस्य ५ किलो अन्नधान्य मोफत वितरित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून तसे आदेश दिले आहेत. राज्याकडून याबाबत २९ जून रोजी शासन आदेश काढण्यात आला आहे. या आदेशानुसार प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांबरोबरच अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सदस्यांनादेखील प्रति सदस्य प्रतिमाह ५ किलो मोफत अन्नधान्य मिळणार आहे. त्यात ३ किलो तांदूळ तर २ किलो गहू यांचा समावेश आहे.

या मोफत योजनेचे धान्यही जिल्ह्याला प्राप्त झाले असून प्रत्येक महिन्यात वेळेवर हे धान्य वितरीत केले जाणार असल्याचेही काळुसे यांनी सांगितले. केंद्र सरकारने मंजूर केलेल्या नियतनाच्या मर्यादेत लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत पात्र लाभार्थ्यांसाठी जुलै ते नोव्हेंबर या पाच महिन्यांसाठी अन्नधान्याचे (गहू व तांदूळ) नियतन मंजूर करण्यात आले आहे. धान्याचे मोफत वाटप त्या-त्या महिन्यांत करण्याच्या सूचना रास्त दर धान्य दुकानदारांनाही देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हा पुरवठा अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सांगितले.

पोर्टेबिलिटी सुविधा...

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र स्थलांतरीत लाभार्थांना या योजनेचा लाभ घेता यावा, याकरिता ‘एक देश, एक शिधापत्रिका’ योजनेंतर्गत पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेण्यासाठी अशा लाभार्थ्यांना प्राेत्साहित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत तसेच या मोफत धान्याचे वितरण रास्त भाव दुकानदारांनी पाॅस मशीनद्वारे करण्याच्या सूचनाही जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

धान्य बघूनच उचल करण्याच्या सूचना...

भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून अन्नधान्य स्वीकारताना शासनाच्या निर्देशानुसार नमुने घेऊन संयुक्‍तपणे अन्नधान्याचा दर्जा तपासून तो समाधानकारक असल्याची खात्री करूनच अन्नधान्याची उचल करण्यात यावी, अशा सूचना राज्याच्या पुरवठा विभागाने केल्या आहेत.

अंत्योदय शिधापत्रिकेवरील एकूण सदस्य : १,३८,३२२

प्राधान्य शिधापत्रिकेवरील एकूण सदस्य : १०,३०,८८५

जिल्ह्यासाठी गहू मंजूर (प्रति मास) : २३३८ मेट्रिक टन

जिल्ह्यासाठी तांदूळ मंजूर (प्रति मास) : ३५०७ मेट्रिक टन

एकूण धान्य मंजूर (प्रति मास) : ५८४५ मेट्रिक टन.

Web Title: I will get the benefit of free grain for another five months