पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून पतीचा मानसिक छळ

By Admin | Updated: October 14, 2015 00:05 IST2015-10-13T20:57:31+5:302015-10-14T00:05:29+5:30

अंजनवेल भ्रष्टाचार प्रकरण : ग्रामसेवकाच्या पत्नीचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

Husband and wife, mental harassment | पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून पतीचा मानसिक छळ

पदाधिकारी, अधिकाऱ्यांकडून पतीचा मानसिक छळ

गुहागर : तालुक्यातील अंजनवेल ग्रामपंचायतीमध्ये रस्ता न करताच लाखो रुपये वापरल्याप्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात तत्कालीन उपसरपंच, ग्रामसेवक व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. माझ्या पतीचा गुहागर पंचायत समितीचे काही पदाधिकारी, अधिकारी तसेच कर्मचारी यांच्याकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप या प्रकरणातील ग्रामसेवकाच्या पत्नीने केला आहे. पतीचे बरे-वाईट झाल्यास त्याला पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी जबाबदार असतील, असे गुहागर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनामध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझे पती सन २००७ ते २०१२मध्ये अंजनवेल ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून काम करीत होते. खरेतर श्रीमंत ग्रामपंचायत असलेल्या अंजनवेल ग्रामपंचायतीचा कारभार करताना गुहागर पंचायत समितीमधील अधिकारी व कर्मचारी यांनी त्यांना कामामधील झालेल्या अनियमितपणाबद्दल वेळीच मार्गदर्शन करून सहकार्य करणे गरजेचे होते. परंतु त्यावेळी सर्वांनी तसे न करता माझ्या पतीला केवळ मानसिक त्रास देण्याचे काम केले.
माझ्या पतीला सन २०१०पासून त्या ग्रामपंचायतीमुळे फार मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करून जीवन जगावे लागत आहे. मार्च २०१२मध्ये त्यांना टी. आय. ए. (अ‍ॅटॅक) आलेला असून, त्यावेळेस डॉक्टरांकडे वेळीच उपचार केल्याने त्यांचा जीव वाचला आहे. अति मानसिक त्रासामुळे हा अ‍ॅटॅक असल्याचे त्यावेळी डॉक्टरांकडून निदान करण्यात आले आहे. मात्र, आता तर अंजनवेल ग्रामपंचायतीमधील या प्रकारामुळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने त्यांना मानसिक त्रासामुळे ते घरात अत्यंत अस्वस्थ असतात, असे त्यांनी म्हटले आहे. पतीच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास अथवा मानसिक त्रासामुळे पुन्हा अ‍ॅटॅक येऊन त्यांचा मृत्यू झाला, तर त्यासाठी गुहागर पंचायत समितीमधील काही पदाधिकारी, अधिकारी व संबंधीत कर्मचारी जबाबदार असतील, असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामसेवकाची सर्वांकडून लूट झाली. दरम्यान, अंजनवेल ग्रामपंचायतीमधील तत्कालीन उपसरपंच, ग्रामसेवक व ठेकेदारावर दाखल झालेल्या गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर जो विषय घेण्यात आला आहे. या विषयाची यापूर्वीही चौकशी करण्यात आली होती.
मात्र, त्यावेळी सदर प्रकरण थांबवण्यासाठी तक्रार करणारे काही पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कारवाई थांबवतो, असे सांगणारे प्रशासकीय अधिकारी यांनी सुमारे १२ लाखांच्या आसपास तत्कालीन ग्रामसेवकाची लूट केली होती. सध्या सुरू असलेल्या तपासामध्ये याची माहिती पुढे येणार असून, यातून अनेकांची नावे समोर येणार आहेत. त्यावेळी यामध्ये अन्य कोणाचा समावेश आहे, याचा उलगडा होणार आहे. (प्रतिनिधी)


रस्ता न करताच लाखो रूपये वापरल्याचा ठपका.
गुहागर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
पतीचे बरे-वाईट झाल्यास पदाधिकारी, अधिकारी जबाबदार.
या विषयाची यापूर्वीही झाली होती चौकशी.
तपासामध्ये अन्य नावे समोर येणार.

Web Title: Husband and wife, mental harassment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.