गटबुक नकाशे मिळत नसल्याने हर्णे, अडखळ गावाला फटका
By Admin | Updated: February 18, 2015 00:53 IST2015-02-18T00:53:47+5:302015-02-18T00:53:47+5:30
गंभीर प्रश्न : शेतकरीच शोधत आहेत आपली जागा

गटबुक नकाशे मिळत नसल्याने हर्णे, अडखळ गावाला फटका
आंजर्ले : हर्णै व अडखळ गावातील अनेक जागांचे गटबुक नकाशे दापोली भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध नाहीत. याचा फटका अनेक शेतकऱ्यांना बसत आहे. आपली जागा नक्की कोठे आहे, हेच कळत नसल्याने शेतकरी संभ्रमात पडले आहेत. याकडे भूमी अभिलेख कार्यालय डोळेझाक करत आहे.
हर्णे हे दापोलीतील इतिहासकालीन बंदर असलेले गाव आहे. या गावाचे भौगोलिक स्थान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. समुद्र किनारी वसलेल्या या गावातील जमिनींचा भाव वधारला आहे. जमिनींची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मात्र, गावातील अनेक जागांचे गटबुक नकाशे भूमी अभिलेख कार्यालयात सापडतच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या जमिनी मोजून घेता येत नाहीत. हीच स्थिती अडखळ गावची आहे. अडखळ हे गाव आंजर्ले खाडी किनारी वसले आहे. या गावाचे महसूलदृष्ट्या विभाजन करण्यात आले आहे. अडखळ व जुईकर मोहल्ला असे दोन भाग करण्यात आले आहेत. अडखळ गावासमोर आता नवा पेच निर्माण झाला आहे. अडखळ गावातील अनेक जमिनींचे गटबुक नकाशेच दापोलीतील भूमी अभिलेख कार्यालयात उपलब्ध नाहीत. याबाबत ग्रामस्थांनी विचारणा केली असता नकाशे नाहीत, एवढेच उत्तर भूमी अभिलेखचे कर्मचारी देतात. त्यामुळे गावातील शेतकऱ्यांना त्यांची जमीन नेमकी कुठे आहे, हेच कळत नाही. पूर्वापार असलेल्या हद्दी गृहीत धरून गावातील ग्रामस्थांनी मोजणीचे अर्ज केले. मात्र, मोजणीत त्या जागा भलतीकडेच आढळून आल्या. त्यामुळे, गावात वादाचे प्रसंग ओढवले आहेत. आपली जागा समजून गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीमध्ये आंबा, काजू व अन्य फळ झाडांची लागवड केली. त्यांची काळजी घेऊन झाडे वाढवली. मात्र, आता मोजणीत ती जागा दुसऱ्याचीच असल्याचे आढळले. केवळ गटबुक नकाशे उपलब्ध नसल्याने आता मोजणी करणेही त्रासाचे ठरत आहे. पैसे भरून मोजणी करण्यासाठी अर्ज केला, तर त्याला गटबुक नकाशा जोडण्याची मागणी केली जाते. मुळात नकाशाच उपलब्ध नाही, तर तो शेतकरी देणार कुठून? परिणामी आपली जागा कोणती, हेच शेतकऱ्यांना कळत नाही. जागेचा सातबारा आहे. मात्र, गटबुक नकाशा नसल्याने मनात इच्छा असूनही या जागेत लागवड करू शकत नाही, अशी स्थिती अडखळमधील शेतकऱ्यांची झाली आहे. खरंतर भूमी अभिलेखने याबाबत कारवाई करणे गरजेचे होते. ज्या जागांचे गटबुक नकाशे नाहीत ते उपलब्ध करून देणे किंवा तयार करणे गरजेचे होते. मात्र, गेली पाच वर्षे याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत बोलताना हर्णेचे सरपंच महेश पवार व अडखळचे सरपंच राजेंद्र कदम यांनी भूमी अभिलेखने तातडीने हर्णे व अडखळ गावातील गटबुक नकाशे तयार करणे आवश्यक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. (वार्ताहर)