पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारी
By Admin | Updated: December 2, 2015 00:41 IST2015-12-01T22:35:35+5:302015-12-02T00:41:07+5:30
दाभोळ खाडी परिसरात ४२ गावे असून, अंदाजे ३ हजार ५०० मच्छिमारांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे,

पारंपरिक मच्छिमारांवर उपासमारी
चिपळूण : लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीमध्ये मासे मरण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे दाभोळ खाडी मच्छिमार भोई समाजाचा पारंपरिक मासेमारी व्यवसाय पूर्णत: बंद झाला आहे. मासेमारी करणाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आली आहे. या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी ११ व १२ डिसेंबर रोजी चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण छेडण्याचा इशारा दाभोळ खाडी संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ यांनी दिला आहे. दि. ९ मे १९९७पासून लोटे औद्योगिक वसाहतीमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे दाभोळ खाडीत मासे करण्याच्या घटना घडत आहेत. निव्वळ खाडीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रदूषणाचा प्रश्न सुटावा, यासाठी दाभोळ खाडी संघर्ष समितीतर्फे रास्ता रोको आंदोलन, साखळी उपोषण, लाक्षणिक उपोषण, सत्याग्रह यांसारख्या मार्गाचा अवलंब करुनसुध्दा दाभोळ खाडीतील प्रदूषणाची समस्या सुटलेली नाही. गेली १७ वर्षे संघर्ष समितीतर्फे शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. दाभोळ खाडी परिसरात ४२ गावे असून, अंदाजे ३ हजार ५०० मच्छिमारांचे कुटुंब या व्यवसायावर अवलंबून आहे, असे अध्यक्ष पडवळ यांनी सांगितले. दाभोळ खाडीतील जलप्रदूषणाचा व मच्छिमार बांधवांचा प्रश्न शासनाने व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक विकास महामंडळ यांनी सोडवलेला नाही. अधिकाऱ्यांकडून केवळ आश्वासनांची खैरात दिली जात आहे. या निषेधार्थ दाभोळ खाडी संघर्ष समिती व अखिल दाभोळ खाडी भोई समाज यांच्यातर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळ, चिपळूण येथील कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांना पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)