मदतीसाठी ‘हात हजारो!’

By Admin | Updated: December 10, 2015 00:48 IST2015-12-10T00:24:50+5:302015-12-10T00:48:35+5:30

निवळी अपघात : विव्हळणाऱ्या जीवांना मिळाला माणुसकीचा झरा

'Hundreds of hands!' For help! | मदतीसाठी ‘हात हजारो!’

मदतीसाठी ‘हात हजारो!’

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावर बावनदी सुतारवाडी वळणावर ट्रक आणि एस. टी. बसचा भीषण अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदतीचे हजारो हात पुढे झाले. त्यात बावनदी, निवळी, हातखंबा, कुवारबाव, मिरजोळे येथील तरुणांचा मोठा सहभाग होता. नेहमीप्रमाणेच या तरुणांनी महामार्गावरील अपघाताच्या वेळी आपदग्रस्तांना मदतीचा हात दिला, त्यामुळे शासकीय यंत्रणांनाही बचावकार्य सुलभ झाले.
बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका करण्याचे मोठे आव्हान होते. परिसरातील क्रेन्स, आगीचे बंब, नगरपालिका व फिनोलेक्स कंपनीचे बंब घटनास्थळी आले. लोक कटर, दोऱ्या, क्रेन, जेसीबी घेऊन आले. एस. टी.चे अधिकारी, कर्मचारी मदतीसाठी आले. बसला दरीत कोसळण्याचा धोका होता. त्यामुळे क्रेनच्या सहाय्याने बस बांधून ठेवण्यात आली.
गाडीत कोंडमारा झालेल्या प्रवाशांचा अक्रोश सुरू होता. वेदनांनी आर्त किंकाळ्या फोडल्या जात होत्या. आत काय झाले ते कळण्यास मार्ग नव्हता. गाडीवर ट्रक कोसळलेला होता व एस. टी.च्या दुसऱ्या बाजूला खोल दरी होती. त्यामुळे मदतकार्यातही अडथळे येऊ लागले.
मदतकार्य सुरू झाले असतानाच नाणीज येथील जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या नाणीज, हातखंबा, संगमेश्वर या तीन ठिकाणच्या रुग्णवाहिका घटनास्थळी आल्या. जिल्हा रुग्णालयातील १०८ ेसेवेच्या रुग्णवाहिकाही घटनास्थळी आल्या. त्यांनी अपघातातील काही जखमी व मृत व्यक्तिंना रुग्णालयात पोहोचवले.
अपघाताचे वृत्त पसरताच त्याठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी जमली. त्यामुळे मदतकार्यात अडथळे आले. बघे कोण व मदतकार्य करणारे कोण ते कळेना. नंतर वाहतूक पोलीस आले. त्यानंतर दीड तासाने रत्नागिरी शहर पोलीस आले. त्यांनी गर्दी पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार केला. मदतकार्य करणाऱ्यांना बाजूला हटवले. ते उशिरा आल्याने त्यांना अपघाताचे व मदत करणारे यांचे गांभीर्य कळले नाही. मात्र, याचवेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग वाढत होती. चार किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूला रांग लागली होती. ही व्यवस्था पोलिसांनी योग्यरित्या हाताळली व वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. त्याचवेळी घटनास्थळी परिसरातील पत्रकार व पत्रकारांमध्ये बाचाबाची झाली. मात्र, नंतर प्रकरण शांत झाले.
महामार्गावर मोठे अपघात झाले की, आपत्ती व्यवस्थापनाचा कसा बोजवारा उडतो, याचा प्रत्यय पुन्हा आला. आपल्याकडे आपत्ती व्यवस्थापनच नाही. त्यामुळे लोकांवर व एस. टी. कर्मचाऱ्यांवर सारे साहित्य गोळा करण्याची वेळ अ
ाली. जवळचे लोक साहित्य घेऊन धावले व लोकांची सुटका केली.
नगरपरिषदेच्या अग्निशामकाने या बचाव कार्यात महत्त्वाची भूमिका बजावली. जितेंद्र विचारे यांच्या उपस्थितीत अग्नीशमन दलाचे कर्मचारी यशवंत शेलार, मोहन कदम, राजेश शिंदे, संतोष गझने, रघ्या शिवलकर, नरेश सुर्वे, संकेत कदम, सुधाकर कांबळे व सुरेश मयेकर यांनी मदकार्यात सहभाग घेताना अपघातग्रस्त बसचा पत्रा कटरद्वारे कापून आतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. (प्रतिनिधी)



मदत करणार तरी कशी?
एस. टी.मध्ये काही प्रवाशांच्या वेदनांनी विव्हळणाऱ्या किंकाळ्या ऐकू येत होत्या. अपघातग्रस्त ट्रकमध्ये कोळसा भरलेला होता. त्यामुळे एस. टी.ने आणलेले गॅस कटरही संभाव्य धोका ओळखून न वापरण्याचे ठरवण्यात आले. क्रेनच्या सहाय्याने ट्रक बाजूला करण्याचाही प्रयत्न करण्यात आला. मात्र, तो पुढे-मागे होत असल्याने आतमध्ये अडकलेल्या गंभीर जखमींना आणखी त्रास होत होता. त्यामुळे जखमींना बाहेर कसे काढणार? असा प्रश्न पडला होता.


देशभ्रतार, आठल्ये यांच्याकडून विचारपूस
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर यांनी त्यांना अपघाताबाबत अधिक माहिती दिली.


जखमींवरील उपचारांवर आरसूळकरांची नजर
या अपघातानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात होत असलेल्या जखमींवरील उपचारांबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरसूळकर स्वत: लक्ष देत होते. जखमींना कोणताही त्रास होणार नाही, अशा प्रकारे रुग्णालयातील व्यवस्था करण्यात आली होती.


चौघे खासगी रुग्णालयात...
स्नेहल दीपक किंजळे, नंदकुमार संजय पवार, सागर सुधीर म्हस्के आणि प्रथमेश खाके हे गंभीर जखमी आहेत. त्यांच्या नातेवाईकांच्या सांगण्यावरून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.


जखमींना स्थानिकांचीमदत
अपघात झाल्याचे कळताच स्थानिक ग्रामस्थांनी अपघातस्थळी धाव घेतली. या मदतकार्यात सुनील खापरे, किशोर गांधी, अनंत धनावडे, जानू खापरे, योगेश खापरे, शिवराम खापरे, राजन खापरे, बाबा बने, राजन सावंत, नंदू बाईत, भरत बाईत, हातखंबा येथील मुन्ना देसाई, सागर म्हापुसकर, बाबू मेस्त्री,अमित देसाई, पवन कुरतडकर, बाळा नायर, महेश पांचाळ, बब्या निवळकर, पिंट्या निवळकर, बब्या सुतार, संजय भुते, विकास शिर्के, भास्कर देसाई, प्रतिक साळवी, अमित सावंत, मिरजोळेचे सरपंच राजेश तोडणकर व अन्य शेकडो तरुणांनी भाग घेतला.

Web Title: 'Hundreds of hands!' For help!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.