अवजारांचे सव्वा कोटी अनुदान रखडले
By Admin | Updated: October 10, 2014 23:00 IST2014-10-10T21:48:12+5:302014-10-10T23:00:39+5:30
कृषी विभाग : संकेतस्थळही खुले होत नसल्याने पेच

अवजारांचे सव्वा कोटी अनुदान रखडले
रत्नागिरी : शासनाच्या कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना यांत्रिक अवजारांसाठी अनुदान देण्यात येते. मात्र, गतवर्षी (२०१३-१४) चे अनुदान कृषी विभागाकडे शासनाकडून प्राप्त झालेले नसल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
फळबागांमध्ये पावसात वाढलेले गवत सफाईचे काम सुरू आहे. थंडी सुरू झाल्यानंतर फवारणी करण्यात येते. मात्र, फवारणीपूर्वी बागांची सफाई करणे आवश्यक आहे. गतवर्षी ४२२ शेतकऱ्यांनी ग्रास कटरची मागणी केली होती. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ५० टक्के, तर राखीव प्रवर्गातील शेतकऱ्यांना ७५ टक्के अनुदानावर अवजारे पुरविण्यात येतात. ग्रासकटरसाठीचे ५४ लाख २५ हजाराचा निधी कृषी विभागाकडे प्राप्त झालेले नाही.
लागवडीपूर्वी शेतीची नांगरणी करण्यासाठी नांगराचा वापर करण्यात येत होता. मात्र, नांगराने नांगरणीसाठी वेळ अधिक जातो, शिवाय मशागत तितकीशी चांगली होत नसल्यामुळे पॉवरटिलर व रोटरी टिलरचा वापर करण्यात येऊ लागला. गतवर्षीच १०० शेतकऱ्यांनी पॉवर टिलर व रोटरी टिलरची मागणी केली होती. संबंधित शेतकऱ्यांचे ६० लाख रूपये अनुदानाचे थकले आहेत. शेतकऱ्यांनी प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर केल्यानंतर कृषी विभागाकडून त्यास पूर्वसंमत्ती देण्यात येते. त्यानुसार शेतकरी स्वत: यांत्रिक अवजारे खरेदी करतात. शासनाकडून मंजूर निधी कृषी विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांना अनुदान वितरीत करण्यात येते. मात्र, गतवर्षीचे शेतकऱ्यांचे पैसे न मिळाल्याने शेतकरीवर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कृषी विभाग संगणकीकृत केल्याने यावर्षीपासून प्रत्येक योजनेसाठीचे प्रस्ताव आॅनलाईन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ल्लँे.ल्ल्रू.्रल्ल संकेतस्थळ खुले होत नाही. शिवाय शेतकऱ्यांना आॅनलाईन प्रणालीबाबत कळत नाही. त्यामुळे या योजनेचा तर यावर्षी बोजवाराच उडाला आहे. (प्रतिनिधी)