शेकडो ब्रास वाळूची बिनधास्त चोरी
By Admin | Updated: June 30, 2014 00:15 IST2014-06-30T00:15:51+5:302014-06-30T00:15:51+5:30
मिरकरवाडा बंदर : प्रांताधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर तुडवले जातात शासकीय नियम

शेकडो ब्रास वाळूची बिनधास्त चोरी
रत्नागिरी : गेल्या दोन वर्षांच्या काळात रत्नागिरीच्या मिरकरवाडा बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे उपसा करून बंदराशेजारी पांढऱ्या समुद्रापर्यंत ढीग रचून ठेवण्यात आला आहे. बांधकामासाठी उपयुक्त असल्याने शेकडो ब्रास वाळू (उपसलेला गाळ) ट्रकद्वारे चोरून नेण्यात आल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात बेकायदा वाळू उपसा समस्या कायम असतानाच मिरकरवाडा बंदरातील वाळूची चोरी नेमके कोण करतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे महसूल खात्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी, गुहागर, चिपळूणसह अनेक ठिकाणी अद्याप बेकायदा वाळू उपसा सुरू आहे. मात्र, याबाबत फोटो वा व्हिडिओद्वारे प्रसारमाध्यमांनी महसूल खात्याच्या डोळ्यात अंजन घातल्यानंतर तेवढ्यापुरती कारवाई केली जाते. त्यानंतर जैसे थे स्थिती निर्माण होते. त्यामुळे या अवैध वाळू उत्खनन व्यवसायाला अधिकाऱ्यांचेच अभय असल्याचा आरोप होत आहे. बेकायदा वाळू उत्खननामुळे शासनाचे रॉयल्टीपोटी मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने बुडत आहे.
जिल्ह्यातील वाळू उपशाबाबत ही स्थिती असताना मिरकरवाडा बंदरात मच्छिमारी नौकांना पाण्याची योग्य खोली उपलब्ध करून देण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून बंदरातील गाळ ड्रेझरद्वारे मोठ्या प्रमाणात उपसण्यात आला.
ही वाळू ड्रेझरमधील सक्शन पंपद्वारे रबरी पाइपमधून किनाऱ्यावर टाकण्यात आली. त्यामुळे मिरकरवाडा बंदरापासून पांढऱ्या समुद्रापर्यंत या वाळूचा प्रचंड मोठा ढिगारा तयार झाला आहे. ही वाळू हजारो ब्रास आहे. किनाऱ्यावरील जाडसर वाळू बांधकामासाठी वापरली जाते. त्यामुळे गेल्या दोन वर्षांपासून या वाळूची चोरी होत आहे. पांढऱ्या समुद्राच्या बाजूने मुख्य रस्त्यापर्यंत असलेल्या वाटेने येऊन ट्रकमधून ही वाळू नेली जात आहे. येथील वाळू चोरट्यांवर कारवाई कधी होणार, असा प्रश्न आता स्थानिक नागरिकांतून विचारला जात आहे. (प्रतिनिधी)