फुणगूस आरोग्य केंद्र व्हेंटीलेटरवर
By Admin | Updated: October 13, 2014 23:02 IST2014-10-13T22:09:44+5:302014-10-13T23:02:46+5:30
रिक्त पदांचा प्रश्न : प्रशासनाची मनमानी

फुणगूस आरोग्य केंद्र व्हेंटीलेटरवर
एजाज पटेल -फुणगूस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासह या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रात गेली कित्येक वर्षे आवश्यक कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हे आरोग्य केंद्रच व्हँटीलेटरवर आले आहे. वेळोवेळी रिक्त पदे भरण्याबाबत मागणी करुनही जिल्हा आरोग्य प्रशासनासह आजतागायत मूग गिळून गप्प बसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खाडी भागातील २० ते २५ गावांतील जनतेच्या मोफत रुग्णसेवेसाठी व औषधोपचारासाठी येथील आरोग्य केंद्र हे एकमेव हक्काचे साधन आहे. काही वर्षांपूर्वी हे आरोग्य केंद्र येथील व्यवस्थापनाच्या मनमानीमुळे नेहमीच चर्चेत होते. मात्र, त्यानंतर सुरळीत व समाधानकारक कारभार चाललेला असताना जिल्हा प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे पुन्हा एकदा हे आरोग्य केंद्र वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
आरोग्य केंद्रात दोन कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी एका वैद्यकीय अधिकाऱ्याची पाच महिन्यांपूर्वी जिल्हा बदली करण्यात आल्याने सध्या येथे एकच वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहे. तालुका तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या आरोग्य सेवा, कुटुंबकल्याण कॅम्प, उपकेंद्र फेऱ्या आदी आरोग्य केंद्रबाह्य कामे पाहावी लागतात. अशावेळी आरोग्य केंद्रात येणाऱ्या रुग्णांना हेलपाटे मारल्यानंतर खासगी दवाखान्यात जाण्याशिवाय पर्यायच राहात नाही.
तीच तऱ्हा उपकेंद्रांचीही आहे. या आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या पोचरी, मांजरे उपकेंद्राला तब्बल १० वर्षे मलेरिया कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. या गावात उपकेंद्राच्या इमारती असूनही येथे मलेरिया कर्मचारी नसल्याने येथील लोकांना गावच्या ठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सेवेपासून व मार्गदर्शनापासून वंचित राहावे लागत आहे. साधा ताप आला तरी १० ते १२ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या अन्य खासगी दवाखान्याचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी या आरोग्यकेंद्राचा वापर करता येतो.
याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकदा जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. या साऱ्या प्रकारामुळे कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारलेल्या आरोग्य केंद्र व उपकेंद्राच्या इमारती रुग्णांअभावी ओस पडतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.