दहा हजार वीजखांब बदलणार कसे ?
By Admin | Updated: November 12, 2014 23:57 IST2014-11-12T21:03:32+5:302014-11-12T23:57:33+5:30
दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत

दहा हजार वीजखांब बदलणार कसे ?
रत्नागिरी : दोन वर्षांत केवळ अडीच हजार पोल बदलणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चार महिन्यांत दहा हजार पोल बसविणार असल्याचे आश्वासन जिल्हा परिषदेला दिले आहे़ मात्र, हे आश्वासन पूर्ण कसे करणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़ जिल्हा परिषद अध्यक्ष जगदीश राजापकर यांच्या दालनात महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी जोरदार चर्चा झाली़ या चर्चेच्या वेळी पदाधिकारी व सदस्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते़ यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ़ हरीष जगताप, माजी उपाध्यक्ष विश्वास सुर्वे, सदस्य दत्ता कदम, अजित नारकर, स्वरुपा साळवी, नेत्रा ठाकूर, लांजा, राजापूर, संगमेश्वरचे पंचायत समित्यांचे सभापती, महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता, उपअभियंता आदी मान्यवर मंडळी यावेळी उपस्थित होती.
यावेळी महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना पंपासाठी देण्यात येणाऱ्या कृषी कनेक्शनबाबत चर्चा झाली़ यावेळी ५० टक्के काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण करण्यात येणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले़
यावेळी महावितरण कंपनीकडून रखडलेल्या कामांबाबत जोरदार चर्चा झाली़ यावेळी पदाधिकारी व सदस्यांनी पाणी पुरवठा योजना वीज कनेक्शन न देण्यात आल्याने त्या सुरु करता येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली़
तसेच जिल्ह्यातील ७१ प्राथमिक शाळांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे, त्याबद्दल सदस्यांनी आक्रमकपणे भूमिका मांडली़ हे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना दिले़ (शहर वार्ताहर)