घर उभे राहण्यापू्र्वीच महापुराने केले उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:35 IST2021-08-24T04:35:30+5:302021-08-24T04:35:30+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/चिपळूण : ‘कुणी घर देता का घर, या महापुराच्या तडाख्यात घर वाहून गेलेल्या कुटुंबाला कोणी ...

घर उभे राहण्यापू्र्वीच महापुराने केले उद्ध्वस्त
लाेकमत न्यूज नेटवर्क
संदीप बांद्रे/चिपळूण : ‘कुणी घर देता का घर, या महापुराच्या तडाख्यात घर वाहून गेलेल्या कुटुंबाला कोणी घर देता का’, अशी आर्त विनवणी करण्याची वेळ शहरातील काही कुटुंबीयांवर आली आहे. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुन्हा घर उभे करण्यासाठी शासनाची मदत मिळेल, अशी अपेक्षा धरून ते बसले आहेत. शहरातील सुमारे ३५० कुटुंबीयांनी या योजनेंतर्गत चार वर्षांपूर्वी प्रस्ताव दिले असून, त्यातील एकही घर उभं राहिलेलं नाही. ही घरे उभी राहण्यापू्र्वीच महापुराने उद्ध्वस्त केल्याने साऱ्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
वाशिष्ठी नदी किनाऱ्यावर वस्ती असलेल्या मुरादपूर, शंकरवाडी, पेठमाप, उक्ताड व बाजारपेठ या भागातील नागरिकांचे महापुराने केलेले नुकसान मोठे आहे. काहींची घरे कोसळली असून, काहींच्या घरांच्या भिंती वाहून गेल्या आहेत. तालुक्यात एकूण ४० जणांची कुटुंब पूर्णत: उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामध्ये शहरातील काही कुटुंबीयांचा समावेश आहे. शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेत ज्यांचे प्रस्ताव आहेत व जे पूरग्रस्त आहेत, अशा कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार व्हावा, अशी मागणी आता हाेत आहे. नगर परिषदेकडे एकूण सुमारे ३५० प्रस्ताव प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पडून आहेत. त्यातील २३ परिपूर्ण प्रस्ताव केंद्र शासनाच्या समितीकडे सादर केले आहेत. हे प्रस्ताव सादर करून दोन वर्षे उलटली, तरी त्याला मंजुरी मिळाली नाही. या योजनेंतर्गत २ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान मिळत असल्याने त्याचा लाभ पूरग्रस्तांना मिळाल्यास मोठा आधार मिळू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------------------------------
अजूनही अनेक कुटुंब स्थलांतरित
सध्या शहर व परिसरात ११ हजारहून अधिक कुटुंबीय बाधित आहेत. त्यामुळे अनेक कुटुंब स्थलांतरित झाली आहेत. त्यातील काहींनी घरांची सफाई सुरु केली असली, तरी काहीजण घराकडे फिरकलेलेच नाहीत. घराच्या भिंती पडल्याने व काहींच्या घरांना तडे गेल्याने ती धोकादायक बनली आहेत. त्यामुळे अजूनही अनेकजण घर सोडून बाहेर राहात आहेत.
-----------------------
पाच मुलांना घेऊन शेजारच्या घरात वास्तव्य
शहरातील मुरादपूर - खालची भोईवाडी येथील मोलमजुरी करणारे विजय शंकर शेडगे व त्यांचा रिक्षा व्यावसायिक भाऊ शैलेश सुभाष शेडगे एकाच घरात विभक्त राहतात. मात्र या घराच्या भिंती वाहून गेल्याने ते धोकादायक झाले आहे. आज पूर ओसरून महिना होत आला तरी त्यांच्या पाच मुलींसह ते शेजारच्या घरात आश्रय घेऊन आहेत.
-----------------------------
चार वर्षांपूर्वी नगर परिषदेकडे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मोठ्या अपेक्षेने प्रस्ताव सादर केले आहेत. मात्र सतत पाठपुरावा करूनही योजना मंजूर झाली नाही. एवढेच नव्हे तर दोनवेळा कागदपत्र सादर केली, तरीही लाभ मिळालेला नाही. आता तर आपले संपूर्ण घर वाहून गेले आहे. शेजारच्या घरात भाड्याने खोली घेऊन राहात आहे.
- रुपेश सीताराम गुढेकर, मुरादपूर, खालची भोईवाडी, चिपळूण
----------------------------
मार्कंडी येथील चाळीत आम्ही दोन कुटुंब राहात असून, खोलीची भिंत पडल्यामुळे एका सदनिकेत सात हजार रुपये भाडे देऊन राहात आहोत. सध्या हे भाडे न परवडणारे आहे. शासनाने वेळीच मदत केली असती, तर दुरुस्तीचे काम करता आले असते.
- सुरेश हरदारे, मार्कंडी, चिपळूण.
---------------------
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुमारे ३५० प्रस्ताव आले असून, त्यातील कागदपत्रे परिपूर्ण असलेले २३ प्रस्ताव केंद्राच्या समितीकडे तेव्हाच पाठविण्यात आले होते. मात्र, त्याला अजूनही मंजुरी मिळालेली नाही. लवकरच अन्य प्रस्तावही सादर केले जाणार आहेत.
- परेश पवार, नगर अभियंता, चिपळूण.