वसतीगृह आजही भाड्याच्या जागेत
By Admin | Updated: January 3, 2016 00:42 IST2016-01-03T00:42:07+5:302016-01-03T00:42:07+5:30
देवरूखातील अवस्था : उपोषणाचा इशारा

वसतीगृह आजही भाड्याच्या जागेत
देवरुख : देवरुख शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मागासवर्गीय विद्यार्थी वसतीगृह हे भाड्याचे जागेतच खितपत पडले आहे. या प्रश्नाकडे जिल्हास्तर, तसेच विभागस्तरावरील प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि वसतिगृहाला भाड्याच्या जागेतून स्वत:च्या हक्काची जागा मिळवून देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अ. वि. जाधव यांनी २५ जानेवारीपासून बेमुदत उपोषणाच्या मार्ग स्वीकारला आहे.
प्रशासन गांभीर्याने वसतिगृहाच्या समस्येकडे लक्ष देत नसल्याने याला वाचा फोडण्यासाठी तसेच हा प्रश्न धसास लावण्यासाठी अखेरीस उपोषणासारखे अस्त्र हाती घ्यावे लागले आहे. देवरुखमधील वेगवेगळ्या महाविद्यालयातील तसेच व्यावसायिक कोर्सेस करणाऱ्या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हे वसतीगृह सोईचे ठरते. मात्र, हे वसतीगृह गेली अनेक वर्ष भाड्याच्या जागेत आहे.
शासनाच्या हक्काच्या जागेत हे वसतीगृह यावे याकरिता जाधव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला असल्याचे सांगितले. जाधव यांनी उपोषण करु नये याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांच्याकडून उपलब्ध झाले आहे. मात्र, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, रत्नागिरी हे संबंधीत वसतीगृह भाड्याच्या जागेत असल्याबाबत समर्थन करताना दिसत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या उपोषणाची दखल न घेता आंदोलनकर्त्यांवरच ठपका ठेवण्यात येत आहे. शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार करण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. जागेचा प्रश्न धसास लावण्यासाठी हे उपोषण आहे, असे ते म्हणतात. (प्रतिनिधी)