बेघरांना हक्काची घरं..!
By Admin | Updated: November 9, 2014 00:43 IST2014-11-09T00:43:31+5:302014-11-09T00:43:31+5:30
रमाई आवास : ३८५ जणांच्या डोक्यावर हक्काचं छप्पर

बेघरांना हक्काची घरं..!
रत्नागिरी : जिल्ह्यातील अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील गरीब व दारिद्यरेषेखालील बेघरांसाठी ३८५ लोकांना रमाई आवास योजनेतून घरकुलांचा आधार देण्यात येत आहे़ त्यासाठी ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये अनुदान खर्च करण्यात येत आहे़
ग्रामीण भागामध्ये आजही हजारो कुटुंबीय बेघर आहेत तर अनेक कुटुंबिय मातीच्या भिंती असलेल्या मोडकळीस आलेल्या घरात गरीबीत दिवस काढत आहेत़ अशा कुटुंबियांना आधार देण्यासाठी शासनाने रमाई आवास योजना सुरु केली़ त्या योजनेचा लाभ अनुसूचित जाती आणि नवबौध्द समाजातील लाभार्थ्यांना शासनाकडून देण्यात येतो़ यंदाही या योजनेचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थींना दिला जाणार आहे.
जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील बेघराकडून ग्रामपंचायतींच्या माध्यमातून प्रस्ताव मागविले होते़ गेल्या तीन वर्षात ग्रामपंचायतीने प्रस्ताव सादर केले होते़ जिल्ह्यासाठी सन २०१३-१४ या आर्थिक वर्षासाठी ५५० घरकुलांचे उद्दिष्ट होते़ त्यापैकी ३८५ घरकुलांना मंजूरी देण्यात
आली आहे.
घरकुलाचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची स्वत:च्या मालकीची किंवा संमत्तीने घेतलेली जागा आवश्यक आहे़ तसेच या घरकुलासाठी शौचालयाची सोयही करण्यात यावी. घरकुलापर्यंत जाण्यासाठी पायवाट किंवा पर्यायी रस्त्याची सोय असणे अवश्यक आहे, या अटी व शर्थींवर लाभार्थ्यांच्या प्रस्तावांना मंजूरी देण्यात आली
आहे़
या घरकुलांसाठी ९५ हजार रुपये देण्यात येणार आहेत़ या लाभार्थ्यांना ३५ हजार रुपयांचा पहिला हप्ता मंजूर करण्यात आला आहे़ मंजूर करण्यात आलेल्या ३८५ घरकुलांवर ३ कोटी ६५ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात येत आहेत़ त्यासाठी पंचायत समित्यांना घरकुलांची रक्कम अदा करण्यात आली आहे़ रमाई आवास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ३८५ गरीब व दारिद्यरेषेखालील कुटुंबियांना या लाभ देण्यात येत आहे़ (शहर वार्ताहर)