पेन्शनच्या वर्गणीतून वृद्धांना दिलं हक्काचं घर-
By Admin | Updated: November 27, 2015 00:15 IST2015-11-26T21:12:19+5:302015-11-27T00:15:08+5:30
आधारवड

पेन्शनच्या वर्गणीतून वृद्धांना दिलं हक्काचं घर-
माणूस आपल्या संसारासाठी आयुष्यात नेहमीच प्रयत्नशील असतो. आयुष्यभर राबराब राबून पै-पै जमा करुन आपलं घरटं उभारतो. पण तेच घरटं आयुष्यातील एखाद्या संध्याकाळी जेव्हा परकं होतं, तेव्हा मात्र हतबलतेशिवाय काहीच हाती लागत नाही. आणि मग असे ज्येष्ठ नागरिक ठरतात ‘नटसम्राट’, कुणी घर देता का घर म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते. परंतु, आपणाकडे इच्छाशक्ती असेल तर काहीही साध्य होऊ शकते. याचं खूप सुंदर उदाहरण म्हणजे काही ज्येष्ठ नागरिकांनी एकत्र येत आपल्या पेन्शनमधून वर्गणी काढून निराधार वृद्धांना हक्काचं घर मिळवून दिलयं. शासनाची एक फुटकी कवडीही न घेता त्यांनी तरुणांनाही लाजवेल असा गरजू निराधार वृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरु करुन माता - पित्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या दिवट्या तरुणांना जोरदार चपराक लगावली आहे.
गणेश दातार वृद्धाश्रमात १३ वृद्धांना हक्काचा आधार मिळाला आहे. आयुष्यभर ज्यांच्यासाठी हाडाची काडं करुन, डोक्यावर ओझी वाहून, रक्ताचं पाणी करुन ज्या मुलांना तळहातावरील फोडाप्रमाणे सांभाळलं, त्याच मुलांनी म्हातारपणी आई - वडिलांना वाऱ्यावर सोडलं तर उतारवयात थरथरणारे हातपाय जातील कुठे. कुणी घर देता का घर म्हणत संध्याकाळचा आसरा शोधतानाच वृद्धाश्रमात कधी आणून टाकण्यात येतं हे त्या थकलेल्या देहाला कळतसुद्धा नाही. अशीच अवस्था यातील काही वृद्धांची आहे. आपल्याला म्हातारपणी आपल्या मुलांकडून व नातेवाईकांकडून आधार मिळावा अशी त्यांची अपेक्षा असते. परंतु, उतारवयातील सुख सगळ्यांच्या नशिबी असेलच असं नाही. खूप संपत्ती आहे, बँकेत खूप पैसा आहे. मात्र, हे सारे असूनसुद्धा कोणाचाही आधार नाही. ज्याच्या आधाराची गरज असते, अशा मुलांनीच घरातून बाहेर काढत वृद्धाश्रमाची वाट दाखवल्याने अनेक वृद्ध माता - पित्यांच्या नशिबी हालअपेष्टा सहन करण्याचे जिणे आले आहे. अशा माता - पित्यांना कोण आधार देणार, हा गंभीर प्रश्न समाजापुढे आहे. जन्मदात्या माता - पित्यांना मुलांनी लाथाडल्यानंतर त्यांना वृद्धाश्रम हाच आधार वाटत आहे. दापोली येथे अनेक वृद्धांची होत असलेली आबाळ पाहून काही सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक एकत्र आले. त्यांनी वृद्धांसाठी आश्रम सुरु करण्याचे ठरविले. सरकारच्या अनुदानाची अपेक्षा न करता स्वत:चा पदरमोड करुन वृद्धाश्रमासाठी निधी गोळा केला. त्या निधीतून वृद्धाश्रम सुरुही झाला आहे. स्वत: वार्धक्याकडे झुकलो असलो तरीही काहीतरी करण्याची आपल्यात उमेद असल्याचे त्यांनी यातून दाखवून दिले आहे. या वृद्धाश्रमात सुरुवातीला केवळ ३ वृद्ध होते. परंतु, आता या वृद्धाश्रमामध्ये एकूण १३ वृद्ध आहेत. त्यामुळे वृद्धाश्रमाकडे अनेकांची पावले वळू लागली आहेत. वृद्धाश्रमात कोणीही हौसेने दाखल होत नाही. परंतु, सध्याची परिस्थिती पाहिली तर वृद्धाश्रम हा वृद्धांचा ‘आधारवड’ बनू पहात आहे.
वृद्धांना वृद्धाश्रम हेचं आपलं हक्काचं घर वाटू लागलं आहे. या वृद्धाश्रमात दाखल झालेल्यांपैकी ३ महिला या एकाच महिन्यात मृत्यूमुखी पडल्या. त्या वृद्ध महिलांचे सर्व विधी, कार्य वृद्धाश्रमाने पार पाडले. परंतु, त्यांच्या अंत्यविधीलासुद्धा कोणी रक्तातील नात्याचे आले नाही. त्यामुळे रक्ताच्या नात्यापेक्षा माणूसकीचे नातंच श्रेष्ठ आहे.
- शिवाजी गोरे
गणेश दातार वृद्धाश्रम नसून, वृद्धाचं हक्काचं घर बनलं आहे. या ठिकाणी येऊन अनेक वृद्धांना आधार वाटतो. एकमेकांशी मिळून मिसळून राहत ते आनंदी जीवन जगताहेत. याचे समाधान वाटते. वृद्धाश्रमाला जागेची अडचण भासत आहे. मात्र, ही अडचण रेगे कुटुंबियांनी ३५ गुंठे जागा देऊन दूर केली आहे. सध्या या वृद्धाश्रमात कोणत्याही समस्या नाहीत. परंतु, पैसा उभा करण्याची गरज आहे. वृद्धाश्रमाला दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास अनेक वृद्ध माता - पित्यांना हक्काचा आधार मिळू शकेल. आम्ही दानशूर व्यक्ती व लोकवर्गणीतून चांगले वृद्धाश्रम चालवून दाखवू.
- प्रा. शांता सहस्त्रबुद्धे
वृद्धांनी वृद्धांसाठी पदरमोड करुन स्वत:च्या वर्गणीतून काढलेला हा वृद्धाश्रम असून, आम्हीसुद्धा उतारवयाकडे झुकलेलो आहोत. त्यामुळे या पुढची जबाबदारी ही समाजाची आहे. तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन हा वसा चालवावा. प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून वागावे.
- अशोक परांजपे गुरुजी
दापोलीचा वृध्दाश्रम
दापोलीत सुरु झालेल्या या वृध्दाश्रमाला प्रतिसाद वाढतो आहे. कारण याठिकाणी वृध्दांना मायेची माणसं मिळत आहेत आणि त्याहीपेक्षा हक्काचं छत मिळालं आहे. त्यामुळे घर गमावल्याचं दु:खं नाही, उलट याठिकाणी घरच्यापेक्षाही मनाने खूप निर्मळ असणारी आणि नितांत प्रेम करणारी माणसं भेटल्याचा आनंद या वृध्दांच्या चेहऱ्यावर झळकताना दिसून येतो. वृध्दाश्रम असणं ही समाजाची दुर्बल बाजू असली तरी अशा वृध्दांना त्यांच्या पडत्या काळात हक्काचा आणि मायेचा आधार देणं, हेही पुण्याचं काम आहे आणि तेच दापोलीत सध्या सुरु आहे.