मानधनाबाबत होमगार्डची उपेक्षा
By Admin | Updated: October 19, 2015 23:51 IST2015-10-19T21:49:31+5:302015-10-19T23:51:15+5:30
महत्त्व वाढले : पण सन्मान नाही...

मानधनाबाबत होमगार्डची उपेक्षा
खेड : राज्यातील वाढत्या दहशतवादाला तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस दल कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आज गृहरक्षक दलाचे महत्व वाढले आहे. मात्र, आजही राज्य सरकारकडून गृहरक्षक दलाची उपेक्षा सुरु आहे.
आपदग्रस्त परिस्थिती तसेच विविध धार्मिक सणांसाठी होमगार्डना कर्तव्यावर बोलावले जाते. यावेळी कर्तव्यावर असतानाचा भत्ता दिला जातो. मात्र, हा कालावधी सोडल्यास होमगार्डना घरीच बसावे लागते. त्यांना मजुरीची कामेही वेळेवर मिळत नाहीत. होमगार्डच्या भत्त्यामध्ये वाढ करण्याचे आश्वासन यापूर्वी देण्यात आले होते. तसेच धुलाई भत्ता वाढवण्याचीही जाहीर घोषणा करण्यात आली होती. मात्र, अद्याप होमगार्डना यापैकी कोणत्याही सुविधेचा लाभ मिळालेला नाही.
आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या होमगार्डना ‘ना मान ना धन’ अशा स्थितीत काम करावे लागत आहे. शासकीय कर्तव्यावर असताना पोलिसांप्रमाणेच दिवसरात्र कर्तव्य पार पाडावे लागते. ज्या पोलीस हवालदारांसमवेत त्यांन कर्तव्यावर पाठवण्यात आले असेल, त्यांची खासगी कामेही करावी लागतात़ अनेक ठिकाणी पानसुपारी आणण्यापासून ते चहावाल्याला चहा आण म्हणून सांगण्यासाठी होमगार्डचा वापर केला जात आहे. कर्तव्य पोलिसांप्रमाणे असले तरी त्यांच्याप्रमाणे अधिकार नसल्याने होमगार्डस्ना मागासलेपणाची जाणीव होत राहते.
होमगार्डना पगार देतानाही सरकार हात आखडता घेत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. होमगार्डना प्रतिमहिना निश्चित समाधानकारक मानधन मिळाल्यास तसेच उपलब्ध सर्व भत्ते वेळेवर आणि आवश्यक प्रमाणात मिळाल्यास होमगार्डना कुटुंबाचा चरितार्थ चालवणे सुलभ होईल. आता याकामी शासनाने पुढाकार घेऊन होमगार्डना न्याय देण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
कामाचा जोर : कामही वेळेवर मिळेना
गृहरक्षक दलाची व्यथा न सांगण्यापलिकडची झाली आहे. कारण वेळेवर काम मिळत नाही. मानधन तर पुरेसे मिळतच नाही. जेव्हा गरज लागेल, तेव्हा हक्काने गृहरक्षक दलाची मदत मागितली जाते. पण त्यामानाने मानधन खूपच कमी मिळते. अगदी सणाच्या काळात सुरक्षा यंत्रणेवर ताण येतो. त्यावेळी गृहरक्षक दलाचे जवान सण मागे सारून संरक्षणासाठी पुढे येतात.मात्र, तरीही हे दल उपेक्षितच आहे.
लक्ष कधी देणार?
गृहरक्षक दलाच्या या समस्या वारंवार वरिष्ठ स्तरावर मांडण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणीच गांभीर्याने विचार केलेला नाही.