एचआयव्हीग्रस्तांना एस. टी. प्रवासात सवलत मिळावी
By Admin | Updated: December 4, 2014 23:40 IST2014-12-04T22:43:40+5:302014-12-04T23:40:19+5:30
गुरुप्रसाद संस्था : रत्नागिरीच्या विभाग नियंत्रकांना दिले निवेदन

एचआयव्हीग्रस्तांना एस. टी. प्रवासात सवलत मिळावी
रत्नागिरी : एचआयव्हीग्रस्त रूग्णांना येथील एड्स प्रतिबंधक उपचार केंद्रात (ए. आर. टी.) तपासणी व औषधे नेण्यासाठी यावे लागते. अनेक वेळा या रूग्णांकडे प्रवास करण्यासाठीही पैसे नसतात. त्यामुळे अशा व्यक्तिंना प्रवास सवलत मिळावी, यासाठी येथील गुरूप्रसाद ट्रस्टतर्फे एस. टी. महामंडळाचे विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.
एड्सग्रस्तांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन हिणकस आहे. मात्र, तो बदलण्यासाठी प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण कार्य करतानाच अशा रूग्णांना जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देण्याचा, त्यांच्यात आशावाद निर्माण करण्याचा प्रयत्न येथील गुरूप्रसाद ट्रस्ट ही स्वयंसेवी संस्था गेली अकरा वर्षे करीत आहे. रूग्णांना जगण्यासाठी आधार देण्याबराबरोबरच गुरूप्रसाद ट्रस्टचे जनजागृतीचे कार्यही निरंतन चालूच आहे. मात्र, जिल्ह्यातील या रूग्णांना येथील ए. आर. टी. केंद्रात येऊन औषधे घेऊन जावे लागते. तसेच तपासणीही करून घ्यावी लागते. बरेचदा येण्यासाठी त्यांच्याकडे पैसेही नसतात. त्यामुळे त्यांच्या उपचारात खंड पडू शकतो. त्यांना प्रवासात सवलत मिळावी, यासाठी येथील गुरूप्रसाद ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी देशमुख यांची भेट घेतली. यावेळी देशमुख यांनी सकारात्मकता दर्शवत यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.
शासकीय स्तरावर मोफत बससेवेसाठी पाठपुरावा करावा, यासाठी रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांच्याकडेही निवेदनाची प्रत देण्यात आली.
बाधित व्यक्तिंसाठी गुरूप्रसाद ट्रस्टतर्फे मोफत मार्गदर्शन केंद्र चालवले जाते. या केंद्रात दररोज औषधोपचारांबरोबर जीवनशैलीतील बदल, योगासने तसेच संतुलित आहार आदींबाबत मार्गदर्शन केले जाते. गरजू रूग्णांना औषधे, प्रवासखर्च यांसारखी आर्थिक मदत ही संस्था करते. यातील अनेक सेवा केवळ जनतेकडून मिळणाऱ्या देणगीवरच दिल्या जातात. या अव्याहत कार्यासाठी संस्थेला समाजाच्या आर्थिक पाठबळाची गरज असल्याचे मत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)