स्वत:चे नुकसान साेसून ‘ते’ धावले इतरांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:32 IST2021-05-27T04:32:51+5:302021-05-27T04:32:51+5:30
अरुण आडिवरेकर लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : चक्रीवादळात तयार झालेला सुमारे १०० पेटी आंब्यांचा बागेत सडा पडलेला असताना त्याकडे ...

स्वत:चे नुकसान साेसून ‘ते’ धावले इतरांच्या मदतीला
अरुण आडिवरेकर
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : चक्रीवादळात तयार झालेला सुमारे १०० पेटी आंब्यांचा बागेत सडा पडलेला असताना त्याकडे दुर्लक्ष करून नाणीजमधील कुटुंबांच्या मदतीसाठी धावत जाऊन मदत कार्य करण्याचे काम नाणीजचे सरपंच गाैरव संसारे यांनी केले. पडलेला आंबा वायाच जाणार हे गृहीत धरून संकटात सापडलेल्यांना मदत करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
तौक्ते वादळात रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावाचेही मोठे नुकसान झाले आहे. त्या दिवशी गावात वाडीवार खूप ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना घडल्या. काहींच्या घरांचे नुकसान झाले. त्यामध्ये पत्रे उडाले, घरांच्या भिंती कोसळल्या, आंबा बागांचे अतोनात नुकसान झाले. या वेळी नाणीज गावचे सरपंच गौरव संसारे हे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन गावात गेले आणि ज्या - ज्या ठिकाणी, घरावर, रस्त्यावर पडलेली झाडे तत्काळ बाजूला करण्यासाठी मदत केली.
गौरव संसारे यांचा पिढीजात आंबा व्यवसाय आहे. स्वतःच्या आंबा बागेत सुमारे १०० पेटी आंब्यांचा सडा पडलेला असतानाही त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करून नाणीजवासीयांच्या प्रत्येक कुटुंबाच्या मदतीला ते धावले. या वेळी त्यांनी महामार्गावर पडलेली झाडेही तत्काळ बाजूला करून रस्ता माेकळा करण्यासाठी प्रयत्न केले.
या मदत कार्यात त्यांना समीर तारी, सागर तारी, नाना वाघाटे, संदेश दरडी यांनीही सहकार्य केले. झाड पडलेले कळताच हातात कटर घेऊन ही मंडळी तेथे पाेहोचत हाेती. झाड कापून बाजूला करण्याचे काम करीत हाेते. तसेच विद्युत मित्र म्हणून ओळखले जाणारे दिनेश रेवळे यांनी झाडे पडल्यामुळे तुटून पडलेल्या विद्युत तारा परत जोडून विद्युत प्रवाह सुरळीत सुरू करण्यासाठी प्रयत्न केले.
त्यांच्या मदतीसाठी गावातील हौशी नवतरुण मित्रमंडळ नाणीजचे सदस्य बाबू सरफरे, चिनू सावंत, सुमित रणसे, सुभाष घडशी, आदित्य सावंत, अनिकेत भागवत, नरेंद्र शिंदे, पंकज घडशी, राजा खावडकर, रुपेश कडू, संदेश सावंत, विनोद भागवत, अनमोल भागवत, अमर हतपले, कृणाल सरफरे दिवसभर धडपड करत होते.
या वादळात घरांचे नुकसान झालेल्या घरमालकांना मंत्री उदय सामंत यांनी दिलेले सिमेंट पत्रे केतन नवाले, नितीन गुरव यांनी पुढाकार घेऊन घरपाेच केले. उपसरपंच राधिका शिंदे, पोलीस पाटील नितीन कांबळे, तंटामुक्त अध्यक्ष सुधीर कांबळे व सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामकृती दल सदस्य यांचेही सहकार्य लाभले.
—————————
हजाराेंचा ताेटा
गौरव संसारे यांचे आजोबा दत्तात्रेय संसारे यांचे महिनाभरापूर्वीच निधन झाले हाेते. त्यामुळे त्यांची व्यवसायातली गणितेही बिघडली. त्यामुळे झाडावरचा आंबा काढायचा तसाच राहून गेला होता. स्वतःचा हजारोंचा तोटा सहन करून गौरव संसारे वादळाच्या दिवशी सकाळी ७ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत तहान, भूक हरपून गावात फिरत होते.
—————————
रत्नागिरी तालुक्यातील नाणीज गावात काेसळलेली झाडे कापून बाजूला करण्यासाठी सरपंच गाैरव संसारे आपल्या मित्रांसह घटनास्थळी दाखल झाले हाेते.