‘त्यां’चा बंधूभाव जीवनापासून मृत्यूपर्यंतचा...!
By Admin | Updated: July 16, 2015 00:29 IST2015-07-16T00:29:19+5:302015-07-16T00:29:19+5:30
आडवलीवर शोककळा : भावाचा मृत्यू सहन न झाल्याने दुसऱ्या भावाचाही हृदयविकाराने मृत्यू

‘त्यां’चा बंधूभाव जीवनापासून मृत्यूपर्यंतचा...!
राजापूर : धाकट्या भावाच्या निधनाचा मानसिक धक्का बसल्याने मोठ्या भावाचा हृदय विकाराच्या धक्क्याने अंत झाला. ही हृदयद्रावक घटना आडवली गावी घडली.तालुक्याच्या सौंदळ पट्ट्यातील आडवली गावी यशवंत कृष्णा चव्हाण (५४) हे आपल्या कुटुंबासमवेत राहात होते. ते एकूण सहा भाऊ असून, परिवार मोठा आहे. स्वत: यशवंत चव्हाण हे सामाजिक व राजकीय क्षेत्रात संपूर्ण परिसरात चांगलेच परिचित होते. काही वर्षे ते आडवली गावचे सरपंचदेखील होते. शिवाय व्यावसायिक होते.मागील काही महिने ते किडनीच्या विकाराने त्रस्त होते. रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात आठवड्यातून तीन वेळा डायलेसीस करण्यासाठी त्यांना न्यावे लागत होते. गेल्या चार - पाच दिवसांपासून त्यांची प्रकृ ती नाजूक बनली होती. परिणामी हातखंबा येथील मुलीकडे त्यांना ठेवण्यात आले होते. सोमवारी सकाळी त्यांना अधिक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांचा मुलगा सूर्यकांत व अन्य सदस्य त्यांना रत्नागिरीला आणत असतानाच वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली. नंतर त्यांचे पार्थिव आडवलीत आणण्यात आले. या घटनेची माहिती सर्व नातेवाईकांना देण्यात आली. यशवंत चव्हाण यांचे भाऊ मुंबईत राहतात. तेदेखील आपापल्या कुटुंबासमवेत घरी पोहोचले तोवर सर्व तयारी पूर्ण झाली होती. गावातील ग्रामस्थही अंत्यविधीला हजर होते.
आपल्या भावाचे शव पाहून मयत यशवंत चव्हाण यांचे ज्येष्ठ बंधू शंकर कृष्णा चव्हाण (६०) यांना शोक अनावर झाला व त्या घटनेचा जोरदार मानसिक धक्कासुद्धा बसला. मात्र, स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करीत ते लगतच्या वहाळावर नैसर्गिक विधीसाठी गेले. काही क्षणातच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला व ते तत्काळ खाली कोसळले. तत्पूर्वी मदतीसाठी त्यांनी जोरदार आरडाओरडा केला. पण ते ऐकायला जवळ कुणीच नव्हते. सर्वजण मृत यशवंत चव्हाण यांच्या अंत्ययात्रेच्या तयारीत होते. तेवढ्यात बाजूला कुणीतरी त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकला. त्याने आरडाओरड करताच अंत्ययात्रेतील अनेकांनी त्या वहाळाकडे धाव घेतली. त्यावेळी शंकर जमिनीवर पडलेल्या अवस्थेत आढळले. काहींनी त्यांना धरुन तत्काळ सौंदळला डॉक्टरकडे नेले. पण, तोवर फार उशीर झाला होता.
या घटनेने आडवलीत खळबळ उडाली. एका भावाच्या अंत्ययात्रेची तयारी सुरु असतानाच विरह सहन न झाल्याने दुसरा भाऊ मृत्यूमुखी पडला होता. अखेर दोन्ही भावांची अंत्ययात्रा एकाच दिवशी निघाली व स्मशानात बाजूबाजूलाच दोन्ही भावांनी चीरनिद्रा घेतली. या घटनेने आडवलीसह सौंदळ पट्ट्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत यशवंत कृष्णा चव्हाण हे आडवली गावचे शिवसेना शाखाप्रमुख सूर्यकांत चव्हाण यांचे वडील होते. या दु:खद घटनेनंतर शोकाकूल चव्हाण कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेतली. यशवंत यांच्यामागे पत्नी व दोन मुलगे, तर शंकर चव्हाण यांच्यामागेही मोठा परिवार आहे. (प्रतिनिधी)