हिर्लोक आरोग्य केंद्र आजारी
By Admin | Updated: September 17, 2014 22:26 IST2014-09-17T21:11:08+5:302014-09-17T22:26:17+5:30
मुलभूत सुविधांची वानवा : पंचक्रोशीच्या आरोग्यदायिनीला रिक्त पदांचा शाप

हिर्लोक आरोग्य केंद्र आजारी
सुरेश बागवे - कडावल -हिर्लोक पंचक्रोशीवासीयांची आरोग्यदायिनी मानल्या जाणाऱ्या प्राथमिक आरोग्य केंद्राला विविध रिक्त पदांचा शाप भोगावा लागत आहे. आरोग्य केंद्रात अनेक मुलभूत सुविधांचीही वानवा आहे. आरोग्य केंद्राकडे वाहनाची सुविधा नाही. ठेकेदारांच्या हेळसांडीमुळे सभागृहाचेही काम अपूर्ण आहे. येथील दुर्गम भागाचा विचार करता, रिक्त असलेल्या जागा त्वरित भरण्याबरोबरच याठिकाणी आवश्यक सोयीसुविधा पुरविणेही गरजेचे आहे.
हिर्लोक पंचक्रोशीमध्ये आरोग्यसेवा मिळण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्राची उभारणी झाली आहे. पंचक्रोशीतील लोकांकरिता आरोग्यदायिनी मानल्या जाणाऱ्या या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह अन्य पदे रिक्त आहेत. यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. या आरोग्य केंद्रासाठी दोन वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र, या दोन्ही जागा रिक्त आहेत. रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारीही नाही. कसाल प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन सावंत यांची याठिकाणी तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. आरोग्य केंद्रासाठी मंजूर असलेल्या एकूण पाच शिपायांपैकी केवळ तीन शिपाई येथे कार्यरत आहेत. रुग्णालयातील सफाई कामगाराची एक जागाही रिक्त आहे. अटेन्डन्सची जागा भरण्यात आली होती. मात्र, या कर्मचाऱ्याची ड्युटीही २०१० पासून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर लावण्यात येते. आरोग्य सेवेसाठी अत्यावश्यक असलेली वाहन व्यवस्था आरोग्य केंद्राकडे उपलब्ध नाही. येथे उपलब्ध असलेली जीप जुनी झाल्यामुळे डिसेंबर महिन्यात निर्लेखित करण्यात आली.
मात्र, त्यानंतर आरोग्य कें द्रासाठी उपलब्ध करून देण्यात आली नाही. तर येथील वाहनचालकाची बदली माणगाव आरोग्य केंद्रात करण्यात आली. हिर्लोकसारख्या दुर्गम भागाचा विचार करता, या आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रात रुग्णांची ने-आण करण्याकरिता वाहन उपलब्ध करण्याची गरज आहे.
हिर्लोक आरोग्य केंद्रात पाणी व वीज यासारख्या मूलभूत सुविधांचीही वानवा आहे. सकाळी व सायंकाळी एकेक तास नळाच्या सहाय्याने पाणी पुरवठा केला जातो. मात्र, तो पुरेसा ठरत नाही आणि वीज पुरवठा खंडीत झाल्यास चार-चार दिवस पाणीही मिळत नाही. येथील बोरिंगच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी करता आला असता, मात्र, बोरिंगमधूनही अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचेच आरोग्य बिघडण्याचा धोका निर्माण झाला आहे. विद्युत पुरवठा बंद होण्याचेही प्रकार वारंवार घडतात.
आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचीही वानवा असतानाही कुडाळ तालुक्यातील एकूण सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी गेल्या वर्षी केवळ हिर्लोक आरोग्य केंद्राने कुटुंब कल्याण योजनेचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले.
हिर्लोक पंचक्रोशीवासीयांना आरोग्य केंद्राचा योग्य प्रकारे लाभ मिळण्यासाठी आरोग्य केंद्राच्या विविध समस्या सोडविण्याची गरज आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती होणेही गरजेचे असून या दुर्गम भागासाठी वाहन उपलब्ध करून देण्याचीही मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
उपकेंद्रे
हिर्लोक प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गिरगाव, घावनळे, वारंगाची तुळसुली, बिबवणे व तेसेबांबर्डे ही उपकेंद्रे येतात.
हिर्लोक पंचक्रोशीचा हा भाग अत्यंत दुर्गम आहे.
आरोग्य केंद्रामध्ये सुविधांची वानवा आहे
दखल घेत नाही
शवविच्छेदनाची रुमही चुकीच्या जागी बांधण्यात येत आहे. इमारतीचे कामही अद्याप अर्धवट असून याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून याची कोणतीही दखल घेण्यात येत नाही.
निवासस्थानाचीदुरवस्था
कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाचीही दुरवस्था झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान ठिकाणच्या भिंतीवरील प्लास्टर उडाले असून फरशाही फुटून गेल्या आहेत. खोल्यांमधील वायरींगही खराब झाले असून बोरिंगच्या पंपाची वायरही खराब झाली होती. ती वसाहतीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने बदलल्याचे सांगण्यात आले.
सभागृहाचे काम दोन वर्षे अपूर्ण
आरोग्य केंद्रातील सभागृहाचे बांधकाम संबंधित ठेकेदाराने गेली दोन वर्षे अपूर्ण ठेवले आहे. त्यामुळे नाराजी पसरली आहे.