हिम्ब्ज हॉलिडेने लावला १०० कोटींचा चुना?
By Admin | Updated: January 28, 2015 00:54 IST2015-01-27T22:15:02+5:302015-01-28T00:54:33+5:30
फसवणुकीचा कहर : रत्नागिरी, लांजा, राजापूर, देवरूख, चिपळूणमधील हजारो लोकांची लुबाडणूक

हिम्ब्ज हॉलिडेने लावला १०० कोटींचा चुना?
रत्नागिरी : सॅफरॉन कंपनीने जिल्ह्यातील शेकडो लोकांना करोडो रुपयांना गंडा घातलेला असतानाच हिम्ब्ज हॉलिडेज प्रा. लि. या कंपनीने रत्नागिरीसह राजापूर, लांजा, देवरुख व चिपळूण या शाखांच्या माध्यमातून गेल्या सहा वर्षांच्या काळात जिल्हावासीयांना सुमारे शंभर कोटींचा चुना लावल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने १२ संशयितांना अटक केली होती. मुंबई पोलिसांचा १०२ दिवसांचा पाहुणचार घेतलेले हे १२ संशयित १४ जानेवारी २०१५ पासून सावंतवाडी पोलिसांच्या पाहुणचारानंतर न्यायालयीन कोठडीत आहेत.
या कंपनीच्या माध्यमातून लोकांची किती फसवणूक झाली याची चर्चाच गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र, हा आकडा शंभर कोटी अर्थात एक अब्जापेक्षा अधिक असल्याचे पुढे येत आहे. हिम्ब्ज हॉलिडेज कंपनीने सर्वप्रथम कुवारबाव, रत्नागिरी येथे शाखा स्थापन केली. ‘ऐश्वर्याची प्राप्ती पर्यटनात’ या नावाखाली आकर्षक योजना जाहीर केली. त्यात रत्नागिरीकर अडकत गेले. सुरुवातीला योजनेत भाग घेणाऱ्या काहींनी सिंगापूर वारीही केली. केलेल्या प्रवासाचे १७ दिवस ते ९० दिवसांच्या काळात संपूर्ण पैसे परत करण्याची ही योजना होती. प्रवास फुकट होतो, पैसे परत मिळतात. यामुळे अनेकांनी या योजनेत पैसे गुंतवले व पर्यटनाची आपली हौस भागवून घेतली. दिवसेंदिवस या शाखेचा व्याप वाढत गेला. रेल्वेतील काही कर्मचारी, अधिकारी तसेच शासकीय सेवेतील कर्मचारी आणि अन्य व्यावसायिकही या योजनेकडे आकर्षित झाले. त्यामुळे यातील गुंतवणूक वाढत गेली.
यानंतर कंपनीने राजापूर, लांजा, देवरुख (संगमेश्वर) व चिपळूण येथे शाखा स्थापन केल्या. तेथेही कंपनीने गल्ला जमविण्याचे काम सुरु केले. चिपळूणनंतर खेडमध्ये शाखा स्थापन होणार होती. परंतु त्याआधीच या कंपनीच्या विरोधात राज्यभरात काही तक्रारी दाखल झाल्या आणि ही कंपनी फसवणूक करणारी असल्याचे समोर आले. त्यामुळे ज्यांनी या योजनेद्वारे कंपनीत पैसे गुंतवले त्यांच्यामध्ये खळबळ उडाली. आपले पैसे परत मिळणार की नाही, याबाबत शंका निर्माण झाली.
‘ऐश्वर्याची प्राप्ती पर्यटनात’ या योजनेचा लाभ घेण्यासाठी हॉलिडे पॅकेजेसचे एक प्रवासी तिकीट खरेदी करुन सदस्य होता येत होते. हे एक तिकीट म्हणजे एक युनिट म्हणून ग्राह्य धरण्यात आले होते.
एका युनिटची खरेदी किंमत १५०० रुपये होती. त्यानुसार प्रवासी तिकीट खरेदी करताना किती युनिट धारकाच्या नावावर जमा होतात, याची नोंद घेतली जात होती. नवीन प्रवासासाठी गिफ्ट व्हाऊचर स्वरुपात दिला जाणारा लाभ हा युनिट धारकाच्या खात्यामध्ये मास्टर युनिट गेन या व्यावसायिक गणिताच्या आधारावर १४ युनिट जमा झाल्यानंतर प्रत्येक युनिटला गेन प्राईज १५० रुपये याप्रमाणे खात्यावर जमा केले जात होते.
एकूणच कंपनीचा गेल्या सहा वर्षांतील नाशिक, पुणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा तसेच कर्नाटकमधील प्रवास याच अटी-शर्तींवर सुरु होता. फसवणुकीच्या तक्रारीनंतर अटक झालेल्या १२ जणांमध्ये मंगेश मधुकर शेर्लेकर, दिलेश बळवंत सपकाळ, संतोष तुकाराम काजरोळकर, राजन मच्छिंद्र चाकणे, गुुरुनाथ जनार्दन सावंत, गणेश बाळू शिंदे, किरण सुधाकर आरेकर, युवराज साताप्पा पाटील, महेश दत्ताराम पालकर, प्रभाकर धाकरोबा दळवी, यमचंद्र नारायण बनसोडे, आरीफ अमिलुद्दिन मर्चंट यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)
रत्नागिरीचे चौघे सावंतवाडी कोठडीत
हिम्ब्ज फसवणूक प्रकरणात कारवाई झालेल्या १२ जणांमध्ये रत्नागिरीतील यमचंद्र नारायण बनसोडे (रत्नागिरी), किरण सुधाकर आरेकर (मुरुगवाडा, रत्नागिरी), महेश दत्ताराम पालकर (कारवांचीवाडी, रत्नागिरी) व प्रभाकर धाकरोबा दळवी (देऊळवाडी, रत्नागिरी) यांचा समावेश आहे. १४ जानेवारीपासून सावंतवाडी पोलिसांनी तपास केल्यानंतर सध्या हे सर्व १२ आरोपी तेथे न्यायालयीन कोठडीत आहेत.
रत्नागिरी शाखा सर्वप्रथम सुरु झाल्यामुळे सर्वाधिक गुंतवणूक रत्नागिरीतच झाली. गेल्या ६ वर्षांच्या काळात रत्नागिरी तालुक्यातून हिम्ब्ज कंपनीत झालेली गुंतवणूक सुमारे ७० कोटी आहे, तर राजापूर, लांजा येथून प्रत्येकी सुमारे ६ कोटी, देवरुखमध्ये सुमारे १० कोटी, चिपळूणमध्ये ८ कोटी, अशी सुमारे १०० कोटीवर गुंतवणूक झाल्याचे सांगण्यात येत आहे.