हर्णै बंदरातील हायमास्ट विझला श्रेयवादात

By Admin | Updated: February 23, 2016 00:31 IST2016-02-23T00:31:07+5:302016-02-23T00:31:07+5:30

दापोली तालुका : ७० वर्षानंतर तांबडं फुटलं, पण राजकीय वादात पुन्हा अंधार

Highway Warmth in the Harbor Harbor | हर्णै बंदरातील हायमास्ट विझला श्रेयवादात

हर्णै बंदरातील हायमास्ट विझला श्रेयवादात

दापोली : प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पारंपरिक हर्णै बंदरात ७० वर्षानंतर हायमास्टच्या रुपात तांबडं फुटलं. अनेक वर्षानंतर परिसर प्रकाशमय झाल्याने हर्णै बंदरातील मच्छीमार सुखावला. मात्र, हर्णै बंदरातील या हायमास्ट दिव्यांचे श्रेय लाटण्यावरुन उद्घाटनाचा वाद सुरु झाला आहे. त्यामुळे दोन राजकीय पक्षांच्या राजकारणात येथील मच्छीमार वेठीस धरला जात आहे.
हर्णै बंदर हे जिल्ह्यातील सर्वात मोठे बंदर असूनही गेले अनेक वर्षे अंधारात होते. या बंदरात वीज ही मोठी समस्या होती. बंदरात वीज नसल्याने काळोख होण्यापूर्वी घाईगडबडीत मासळीचा व्यापार उरकावा लागत होता. त्यामुळे मच्छीमारांचेही नुकसान होत होते. गेल्या वर्षी नाविन्यपूर्ण योजनेतून हर्णै बंदरातील हायमास्ट दिवे मंजूर करण्यात आले. सप्टेंबर महिन्यात हर्णै बंदरातील सरकारी जागेवर टॉवर उभा करुन हायमास्ट बसविण्यात आला.
हे काम पूर्ण झाल्यानंतर जुन्या ट्रान्सफॉर्मरवरुन हायमास्टसाठी नवीन ट्रान्सफॉर्मरसुद्धा मंजूर झाला. या ट्रान्सफॉर्मरवरवरुन स्वतंत्र वीज जोडणी देऊन नवीन हायमास्ट दिवे सुरु करणे आवश्यक असताना तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करुन राजकारण करण्यात येत आहे. त्यामुळे बंदरातील काळोखाची स्थिती ‘जैसे थे’ आहे.
विकासकामात राजकारण नको, असे म्हटले तरी प्रत्येक गावात विकास कामाचे श्रेय लाटण्यावरुन सत्ताधारी व विरोधकांमध्ये नेहमीच वाद होत असतात. तसाच वाद हर्णै बंदरातील हायमास्ट दिवे पेटविण्यावरुन सुरु झाला आहे.
हायमास्टचे काम होऊन दोन महिने झाले. परंतु, हे काम जिल्हा नियोजनमधून मंजूर झाल्याने व त्याचे अध्यक्ष पालकमंत्री असल्याने त्यांच्याच हस्ते या हायमास्टचे उद्घाटन व्हावे, असा एक मतप्रवाह आहे. तर स्थानिक आमदार राष्ट्रवादीचे असल्याने त्यांनी हे काम जिल्हा नियोजनमध्ये सुचविले. त्यानंतर त्यांच्या प्रयत्नाने हे काम मंजूर झाले. त्यामुळे त्यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, अशी विरोधी पक्ष राष्ट्रवादीची भूमिका आहे. मात्र, या वादात हर्णै बंदरातील हायमास्ट अजूनही बंदच आहे. (प्रतिनिधी)
श्रेयासाठी धडपड : उद्घाटन नेमके करायचे कुणी?
गावचा विकास कोणी केला यापेक्षा विकास होणे महत्वाचे. विकासकामात कोणी राजकारण आणू नये. मच्छिमार बांधवांना या हायमास्ट दिव्याची गरज आहे आणि ती पूर्ण झाली पाहिजे. विकासकामात राजकारण आड आल्यामुळे बंदराचा विकास अनेक वर्षे रखडला आहे. आता तरी विकास कामाचे श्रेय लाटण्यावरुन राजकीय पक्षांनी वाद करु नये तर स्थानिक मच्छिमारांची सोय पहावी.
- नारायण रघुवीर,
मच्छिमार नेते.
 

हायमास्टचे श्रेय मिळू नये, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर हे महावितरणवर दबाव टाकत आहेत. त्यांच्या दबावामुळे महावितरणचे अधिकारी वीजजोडणी देत नाहीत. स्थानिक आमदारांच्या अधिकारांवर सत्ताधारी पक्ष गदा आणत आहे.
- रऊफ हजवाणे, अध्यक्ष, सुवर्णदुर्ग मच्छिमार सोसायटी.
 

पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जिल्हा नियोजनमधून हायमास्ट मंजूर केल्याने त्याचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते व्हायला हवे. परंतु, सत्ताधारी पक्षाला श्रेय मिळू नये म्हणून आमदार संजय कदम यांनी घाईगडबडीत हायमास्टचे उद्घाटन केले. एवढी घाईगडबड कशासाठी? - सुनील अंबुर्ले
 

स्थानिक आमदार म्हणून या कामाचे मला श्रेय मिळू नये यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकून वीजजोडणी दिली जात नाही. हे काम मीच जिल्हा नियोजनमधून घेण्यासाठी सुचवले होते. तरीही सत्ताधाऱ्यांकडून श्रेय लाटण्याचा प्रयत्न झाला आहे. परंतु, १३ फेब्रुवारी रोजी नियोजित उद्घाटन असल्याचे सांगुनसुद्धा अधिकारी दबावाला बळी पडल्याने रात्री जनरेटरच्या सहाय्याने या हायमास्टचे उद्घाटन आम्ही केले.
- संजय कदम,
आमदार, राष्ट्रवादी.
 

Web Title: Highway Warmth in the Harbor Harbor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.