रो-रो सेवेतून सर्वाधिक उत्पन्न
By Admin | Updated: May 11, 2015 23:28 IST2015-05-11T20:56:14+5:302015-05-11T23:28:47+5:30
कोकण रेल्वे : ६५ कोटी रूपयांचा महसूल प्राप्त

रो-रो सेवेतून सर्वाधिक उत्पन्न
खेड : कोकण रेल्वेच्या रो - रो सेवेला सध्या चांगले दिवस आले आहेत. मालवाहू ट्रक इच्छितस्थळी पोहोचवणाऱ्या रो - रो सेवेच्या माध्यमातून गेल्या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेला ६५ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. रेल्वे प्रशासनाने ही माहिती दिली. कोकण रेल्वेला एवढ्या मोठ्या प्रमाणात महसूल मिळाल्याने कोकण रेल्वे ही सेवा आता अधिक गतिमान करण्याच्या प्रयत्नात आहे.रेल्वे प्रशासनाला सर्वाधिक उत्पन्न रो - रो आणि मालगाडी सेवेच्या माध्यमातून मिळत असल्याने या सेवेला आता कोकण रेल्वे सर्वाधिक प्राधान्य देणार आहे. कोकण रेल्वेने उत्पन्न वाढीच्या दृष्टीने सुरू केलेली ही सेवा रेल्वेच्या चांगलीच फायद्यात पडली आहे. दरवर्षी कोकण रेल्वेने या सेवेत अमुलाग्र बदल केले आहेत. रो -रोच्या फेऱ्यांमध्ये आता वाढही झाली आहे. आजच्या घडीला कोकण रेल्वे मार्गावरून दिवसागणिक ४ अप डाऊन फेऱ्या होत आहेत. यामुळे सन २०१२ - १३मध्ये ४८ हजार, तर २०१३ - १४मध्ये ५५ हजार मालवाहक ट्रक्सची ने - आण करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये या सेवेला अपघात झाले नव्हते़
मात्र, गतवर्र्षी करंजाडी रेल्वे स्थानकानजीक मालगाडीला झालेल्या अपघातानंतर गणेशोत्सवादरम्यान या सेवेला बे्रक लागला होता. परिणामी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले आणि रेल्वे प्रशासनाला मोठा आर्थिक फटका बसला़ त्यानंतरच्या काही महिन्यांकरिता कोकण रेल्वेने मालगाडी सेवा खंडित केली होती. यामुळे आणखी आर्थिक नुकसान झाले. नोव्हेंबरपासून ही सेवा पूर्ण दमाने सुरू करण्यात आली़ याचा मोठा लाभ कोकण रेल्वेला झाला़ तब्बल ६५ करोड रूपयांचा महसूल गतवर्षी कोकण रेल्वेला प्राप्त झाल्याने रो - रो सेवेमध्ये अमुलाग्र बदल घडवित चांगल्या सुविधा देण्याचा कोकण रेल्वेचा सध्या मानस आहे. या सर्व उत्पन्नाचा प्रवाशांना अधिक सुविधा देण्यासाठी वापर होणार आहे. (प्रतिनिधी)
रो- रो सेवेला सध्या चांगले दिवस.
कोकण रेल्वेला मोठ्या प्रमाणात महसूल मिळण्याची पहिली वेळ.
कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले होते.
सेवेत आमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न करणार.