हेल्पलाईन सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:31 IST2021-04-25T04:31:46+5:302021-04-25T04:31:46+5:30
रत्नागिरी : रत्नागिरी राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस यांच्याकडून कोविड रुग्ण हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा ...

हेल्पलाईन सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी राष्ट्रवादी युवक आणि विद्यार्थी काँग्रेस यांच्याकडून कोविड रुग्ण हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिल आकारण्यात येत असेल तर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासाठी बंटी वणजू, मंदार नैकर, सायली शिवलकर, सूरज शेट्ये, संकेत कदम यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
उंची वाढविण्याची मागणी
राजापूर : रेल्वे स्टेशन मार्गावर पावसाळ्यात पुराचे पाणी भरून वाहतूक ठप्प होत असते. त्यामुळे या रस्त्याची उंची वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. गंगा फाटा ते पुजारवाडी उन्हाळे, दोनिवडे रस्त्यावर पाणी येत असल्याने रस्त्यांची व मोऱ्यांची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी होत आहे.
शिलाई यंत्रांचे वाटप
चिपळूण : मुस्लिम समाजातील महिलांना आत्मनिर्भर बनण्यासाठी तालुका मुस्लिम विकास मंचतर्फे काही महिलांना शिलाई यंत्रांचे वाटप करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय मानवाधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शब्बीर अलवी यांचा मंचचे अध्यक्ष अन्वर तेचकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
लसीकरणाची मागणी
चिपळूण : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या व्यापारी, बँक कर्मचारी यांना जीव धोक्यात टाकून काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांना प्राधान्याने लस देण्यात यावी, अशी मागणी व्यापारी शिरीष काटकर यांनी प्रशासनाकडे केली आहे.
उपोषणाचा इशारा
खेड : शहरातील सन्मित्र नगरातील परकार चाळीतील सामाईक गटारांच्या साफसफाईचे आश्वासन देऊनही तीन महिन्यांनंतरही ठोस कार्यवाही झालेली नाही. या निषेधार्थ परकार चाळीतील रहिवासी दिनांक १ मे पासून नगर परिषद कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहेत.
पथदीप उभारणी
चिपळूण : शहरातील खेंड उपनगरातील रसाळ चाळ परिसरात अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पथदीप उभारणीच्या मागणीला यश आले आहे. नागरिकांच्या मागणीची दखल घेत पथदीप उभारण्याठी नगर पालिकेने मंजुरी दिली आहे.