गरजू रुग्णांसाठी मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:47+5:302021-05-25T04:35:47+5:30
दापोली : येथील अनुबंध संस्थेतर्फे खान बहादूर मेमोरिअल हॉस्पिटलला गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगीदाखल देण्यात आला. ...

गरजू रुग्णांसाठी मदत
दापोली : येथील अनुबंध संस्थेतर्फे खान बहादूर मेमोरिअल हॉस्पिटलला गरीब आणि गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देणगीदाखल देण्यात आला. यावेळी हे उपकरण कसे चालवायचे, याचेदेखील प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. याप्रसंगी डॉ. अनिरुद्ध डोंगरे, अरुण वालावलकर, ओंकार कर्वे आदी उपस्थित होते.
इंधनदरवाढ कायम
रत्नागिरी : कोरोनाचे संकट अधिक वाढु लागले आहे. त्यातच आता इंधन दरवाढीने सामान्य नागरिकांना हैराण केले आहे. पेट्रोल, डिझेल आणि घरगुती सिलेंडरचे दर वाढू लागल्याने आधीच इतर वस्तूंची महागाईने पोळलेल्या नागरिकांना या दरवाढीचा चटका बसत आहे.
उद्योगांना फटका
खेड : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक व्यवसाय, उद्योग पुन्हा ठप्प झाले आहेत. गेल्यावर्षी नोव्हेंबर डिसेंबरपासून काही व्यवसाय सुरू झाले होते. आर्थिक घडी आता सुरू होईल, असा दिलासा व्यावसायिक, उद्योजकांना मिळू लागला असतानाच एप्रिल महिन्यात पुन्हा लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प झाले आहेत.
लॉकडाऊन संपण्याची आशा
चिपळूण : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच १५ एप्रिलपासून सर्वत्र लॉकडाऊन सुरू आहे. सुरुवातीला एप्रिल अखेरपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र ते आता मे अखेरपर्यंत सुरू आहे. आता पुन्हा हे वाढणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु आर्थिक मंदीत अडकलेल्या नागरिकांना हे लॉकडाऊन १ जूननंतर संपेल, अशी आशा वाटत आहे.
उष्णता वाढतेय
खेड : गेल्या आठवड्यात जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाचा फटका जिल्ह्याला बसल्याने अतोनात नुकसान झाले. त्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग अधिक वाढला आहे. या दोन संकटांबरोबरच आता उष्णतेतही मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. कोरोनाचे संकट असतानाच आता उष्णतेचे विकारही मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत.
रस्त्याचे काम अर्धवट
देवरुख : देवरुख - रत्नागिरी मार्गावरील देवरुख - तळेकांटे या रस्त्याचे काम उन्हाळी हंगामात सुरू करण्यात आले आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी संपेल, असेच सांगितले जात होते. मात्र हे काम अजूनही अर्धवट राहिले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे काम कसे होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
वीज खांब गंजलेले
राजापूर : तालुक्यातील कोतापूर - घुमेवाडी येथील तीन वीजखांब तळाकडील बाजूने पूर्णपणे गंजलेले आहेत. हे पोल केव्हाही तुटून पडण्याची शक्यता आहे. वीजवाहक तारा एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत. येत्या पावसाळ्यामध्ये हे गंजलेल्या वीज खांबांचा अधिकच धोका होणार आहे.
आरोग्य केंद्राला मदत
सावर्डे : चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील विठ्ठलवाडी गणेश मित्रमंडळातर्फे ‘ एक हात मदतीचा’ संकल्पनेतून अडरे प्राथमिक आरोग्य केंद्राला टॅबचे वाटप करण्यात आले आहे. तसेच व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन डीच्या गोळ्यांचे गरीब रुग्णांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.
पंचनामे रखडले
खेड : आठ दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर थडकलेल्या तौक्ते चक्रीवादळात तालुक्यातील चिंचवली ढेबेवाडी येथील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. मात्र या गावातील नुकसानीचे पंचनामे अजूनही संथगतीने होत असल्याने नुकसानग्रस्तांना मदत मिळण्यात अडचणी येणार आहेत.
डांबरीकरणाची मागणी
खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील ४४ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम अजूनही अपूर्णच आहे. पावसाळा नजीक आला आहे. मात्र काही ठिक़ाणी अजूनही रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम अर्धवट ठेवण्यात आल्याने रस्ता पावसाळ्यात धोकादायक बनणार आहे.