अवजड वाहतुकीचा भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:38 IST2021-09-10T04:38:36+5:302021-09-10T04:38:36+5:30
राजापूर : जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटासह अन्य मार्ग भूस्खलन आणि दरडी कोसळल्याने बंद झालेले असताना राजापूर ...

अवजड वाहतुकीचा भार
राजापूर : जिल्ह्याला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणाऱ्या आंबा घाटासह अन्य मार्ग भूस्खलन आणि दरडी कोसळल्याने बंद झालेले असताना राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाट अवजड वाहतुकीचा जिल्ह्याचा भार पेलत आहे. त्यामुळे या घाटातील रस्त्याची चाळण झाली आहे.
रुग्णवाढीचा दर अधिक
रत्नागिरी : राज्यातील कोरोना रुग्णवाढीचा दर देशाच्या तुलनेत कमी असला तरी नगर, सातारा, सोलापूर, सांगली, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील रुग्णवाढीचा दर अधिक आहे. त्यामुळे या जिल्ह्यांत गणेशोत्सवासाठी येणाऱ्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
एस. टी. फेऱ्या बंद
रत्नागिरी : कमी भारमानामुळे एसटीच्या ५०० फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. यामध्ये खराब रस्त्यांमुळे बंद असलेल्या २८ फेऱ्यांचा समावेश आहे. रत्नागिरी विभागात सध्या ६१४ गाड्यांद्वारे ३,२०० फेऱ्या सुरू आहेत. शाळा-महाविद्यालये बंद असल्याने एस. टी. च्या उत्पादनावर परिणाम झाला आहे.
अवाजवी भाडे, कारवाई होणार
रत्नागिरी : गणेशोत्सवानिमित्ताने कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची संख्या जास्त आहे. या कालावधीत प्रवाशांकडून दामदुप्पट भाडे आकारण्यात येते. जर कोणी जास्तीचे पैसे वसूल केले तर त्यांच्याबाबत तक्रार आल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
गृृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली
चिपळूण : अतिवृष्टीमुळे जमिनीला भेगा, डोंगर खचणे, दरड कोसळण्यामुळे स्थलांतर आणि पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झालेल्या कुटुंबांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. धरणग्रस्त गावांची भूगर्भशास्त्रज्ञांनी पाहणी करून सर्वेक्षण केले आहे.