मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपले
By Admin | Updated: June 19, 2015 00:18 IST2015-06-19T00:15:18+5:302015-06-19T00:18:50+5:30
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला.

मुसळधार पावसाने रत्नागिरीला झोडपले
रत्नागिरी : जिल्ह्याच्या अनेक भागांत गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. रत्नागिरीसह राजापूर, लांजा, खेड, आदी भागांत पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. रत्नागिरी शहरात मध्यरात्रीपासूनच पावसाने जोरदार सुरुवात केली. दुपारपर्यंत हा पाऊस मुसळधार बरसत होता. यामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. तालुक्यातील नाणीज येथे मध्यरात्री रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावर वडाचे झाड कोसळल्याने वाहतूक सकाळपर्यंत ठप्प झाली होती.
लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील वीज गायब झाली, तर काही ठिकाणी दूरध्वनी सेवाही बंद झाली आहे. चिपळुणात मात्र दिवसभर पावसाची रिपरिप सुरू होती. राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातही जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शेतीच्या कामातून शेतकऱ्यांनी विश्रांती घेणे पसंद केले. खेड तालुक्यातील काही भागांत जोरदार पाऊस झाला. मंडणगड, गुहागर तालुक्यांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. (प्रतिनिधी)