मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले
By Admin | Updated: July 12, 2014 00:33 IST2014-07-12T00:31:30+5:302014-07-12T00:33:34+5:30
पडझड : भोपण खाडीत मृतदेह सापडला

मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले
रत्नागिरी : गेले दोन दिवस मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपले आहे. या पावसामुळे अनेक तालुक्यांत पडझडीच्या घटना घडल्या आहेत. भोपण (ता. दापोली) खाडीत आज, शुक्रवारी मृतदेह सापडला. डोर्ले (ता. रत्नागिरी) येथे विजेच्या तारेच्या धक्क्याने एक गाय मृत झाली आहे. देवरूख, संगमेश्वर, लांजा येथे वृक्ष कोसळला, तर दापोली, राजापुरात घरांचे नुकसान झाले. मंडणगडमध्येही दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे भारजा व उपनद्यांमध्ये पाणी भरू लागले आहे.
दापोली तालुक्यात एका घराचे अंशत: १ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाले. तालुक्यातील भोपण गावातील प्रदीप वेळणस्कर यांचा मृतदेह खाडीत सापडला. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
देवरूख बाजारपेठेतील जुनाट वृक्ष कोसळल्याने एक रिक्षा, दोन मोटारसायकल आणि तब्बल दहा दुकानांचे नुकसान झाले आहे. संगमेश्वर येथील रिक्षा स्टँडजवळही जुनाट वृक्ष कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प होती.
मुंबई-गोवा महामार्गावर लांजा येथे शेवरीचे झाड पडल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली. तसेच एक संरक्षण भिंत कोसळून नुकसान झाले आहे. लांजा तालुक्यातही घरागोठ्यांचे नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. रत्नागिरी तालुक्यातील डोर्ले येथे विजेच्या तारेच्या धक्क्याने एक गाय मरण पावली, तर राजापूर तालुक्यात ४ घरांचे अशंत: ३७ हजार ७५० रुपयांचे नुकसान झाले आहे.
मंडणगडमधील भारजा व उपनद्यांमध्ये दोन दिवसांच्या या मुसळधार पावसाने आताच पाणी भरू लागले आहे. (प्रतिनिधी)