वळवाने झोडपले रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात जोरदार पाऊस
By Admin | Updated: May 28, 2014 01:31 IST2014-05-28T01:30:35+5:302014-05-28T01:31:29+5:30
लांजात ‘आठवडा बाजार’ भिजला

वळवाने झोडपले रत्नागिरी, चिपळूण, संगमेश्वरात जोरदार पाऊस
रत्नागिरी : रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर तालुक्यांना आज, मंगळवारी वळवाच्या पावसाने जोरदार हजेरी लावत झोडपून काढले. देवरुखात वडाचे झाड कोसळल्याने एक दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला. या घटनेमुळे संगमेश्वर-देवरुख या दोन शहरांचा संपर्क तुटला होता. रत्नागिरी शहरात सायंकाळी अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. मात्र केवळ दहा मिनिटांतच पावसाने विश्रांती घेतली. संगमेश्वर तालुक्यात मात्र पावसाने ‘मुसळधार’ हजेरी लावली. देवरुखनजीक महाडिक स्टॉप येथे वडाचे जुनाट झाड कोसळल्याने एक दुचाकीस्वार जखमी झाला. संगमेश्वर-देवरुख हा मार्ग कायम गजबजलेला असतो. मात्र हे झाड कोसळले, त्यावेळी पाऊस सुरू असल्याने रस्ता ओस पडला होता. त्यामुळे जीवितहानी टळली. सुमारे दीड तासाच्या परिश्रमानंतर हे झाड बाजूला करण्यात आले. त्यानंतर संगमेश्वर ते देवरुख ही वाहतूक सुरू झाली. चिपळूण शहर व ग्रामीण भागात आज, मंगळवारी सायंकाळी वार्यासह पावसाने संततधार हजेरी लावली. त्यामुळे काही काळ व्यावसायिकांसह सर्वसामान्यांचे जीवन विस्कळीत झाले. चिपळुणात आज दिवसभर उष्णता वाढली होती. वातावरणही ढगाळ होते. त्यामुळे दुपारनंतर पाऊस पडेल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच सायंकाळी पावसाने हजेरी लावून गारवा निर्माण केला. अर्धा तास सर्वत्र पाऊस पडला. त्यामुळे व्यापार्यांसह सर्वसामान्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसाची शक्यता तसेच वादळी वार्याची भीती यामुळे थेट कोयनेतून पाऊण तास विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. कोठेही वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. लांजातही मंगळवारी जोरदार पाऊस झाला. लांजाचा आठवडा बाजार असल्याने ग्राहक आणि व्यापार्यांची तारांबळ उडाली. रस्त्यावर वस्तू विकणार्यांची मोठी धावपळ उडाली. सायंकाळी उशिराने वीजपुरवठाही खंडित झाला होता. (प्रतिनिधी)