आरवली : संगमेश्वर तालुक्यातील पेढांबे खाडी परिसरात गेले अनेक दिवस सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळूचा मोठ्या प्रमाणात उपसा केला जात आहे़ खुलेआम हाेणाऱ्या या वाळू उपशाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष हाेत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या वाळूमाफियांना राजकीय वरदहस्त असल्याने प्रशासन कारवाई करण्यास धजत नसल्याची चर्चा आहे़ काही दिवसांपूर्वी संबंधितांवर कारवाई करण्यात आली होती़; मात्र राजकीय हस्तक्षेपानंतर या कारवाईवर पडदा टाकण्यात आला़
सध्या कोरोनाचा काळ असल्याने याचा गैरफायदा घेत बंदी असूनही अनेक वाळूमाफिया खाडी परिसरात सक्शन पंपाच्या सहाय्याने वाळू उपसा करत आहेत. करजुवे परिसरात काही वाळू व्यावसायिकांवर कारवाई करून हा व्यवसाय बंद करण्यात आला; मात्र काही व्यावसायिक आपल्या राजकीय शक्तीचा फायदा घेत बिनधास्त वाळूउपसा करीत आहेत. प्रशासनही या बाबीकडे दुर्लक्ष करत आहे.
पेढांबे खाडी परिसरात गेले अनेक दिवस रात्रीच्या वेळी सक्शन पंपाच्या सहाय्याने राजरोस वाळू उपसा केला जात आहे; मात्र प्रशासनाच्या या भागातील संबंधित अधिकाऱ्यांना याची कल्पना नसावी, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी या वाळूच्या उपशावर कारवाई करण्याचा फार्स करण्यात आला़; मात्र त्यानंतरही अविरत हा उपसा सुरू आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष घालून हा अवैध वाळूउपसा थांबवावा, अन्यथा ग्रामस्थांना रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा देण्यात आला आहे़
------------------------
राजकीय शक्तीचा वापर
वाळूउपसा करण्यावर बंदी आल्याने बांधकामाची कामे करणे सर्वसामान्यांना कठीण होऊन बसले आहे. यासाठी ही बंदी उठवण्याची मागणी सर्वसामान्यांकडून अनेक वेळा केली गेली; मात्र ही बंदी कायम राहिल्याने शासनाचा महसूल बुडाला असून, धनदांडगे वाळूमाफिया आपल्या राजकीय शक्तीचा वापर करून राजरोस वाळू उपसा करून आर्थिक फायदा उठवत आहेत.