मंडणगड तालुक्यात आरोग्य व्हेंटीलेटरवर
By Admin | Updated: June 24, 2015 00:43 IST2015-06-24T00:28:46+5:302015-06-24T00:43:11+5:30
रूग्णांची गैरसोय : दुर्लक्षात मात्र सातत्य

मंडणगड तालुक्यात आरोग्य व्हेंटीलेटरवर
देव्हारे : मंडणगड तालुक्यातील तीन डॉक्टर सुट्टीवर गेल्याने आणि त्यांच्या जागी अन्य डॉक्टर्सची नियुक्ती न झाल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. तालुक्यातील आरोग्य विभागच सध्या व्हेंटीलेटरवर असल्याचे दृष्य पाहायला मिळत आहे. देव्हारे, कुंबळे, पणदेरी या महत्वाच्या ठिकाणची ही स्थिती असल्याने आरोग्य विभागाने या प्रकारात लक्ष घालण्याची मागणी केली जात आहे.
तीन प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर्सची पदे भरण्यात येत नाहीत, असलेले डॉक्टर्स विविध कारणांनी वेगवेगळ््या ठिकाणी जातात. आरोग्य सेवेतील या प्रकाराचा फटका परिसरातील रूग्णांना बसत आहे. या डॉक्टर्सचा भार अन्य डॉक्टर्सवर पडत असल्याने आरोग्य विभागाची अवस्था बिकट बनली आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ़ इनामदार, डॉ़ शेळके हे वर्षभर पुढील शिक्षणासाठी रजेवर गेले आहेत. त्यांच्या जागी कुंबळे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पुंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुंबळे येथील डॉक्टरची नियुक्ती देव्हारे येथे झाल्याने कुंबळे येथील पद रिक्त आहे. पणदेरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील पद गेली बारा वर्षे रिक्त असून ते भरले जात नाही. तेथील डॉक्टर सुट्टीवर आहेत, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या जागेवर डॉ. वलकर काम पहात आहेत़.
देव्हारे येथील डॉक्टर सुट्टीवर गेल्यामुळे एकाच डॉक्टरवर कामाचा ताण पडत आहे़ आठवड्यातून दोन ते तीन दिवस शिबिरासाठी संबंधित डॉक्टर कुंबळे येथे जातात़ तर महिन्यातून दोन वेळा मिटींगसाठी रत्नागिरी येथे जावे लागते़ त्यामुळे शासकीय दवाखाना असूनही, रूग्णांना खासगी डॉक्टरांची मदत घ्यावी लागत आहे. पणदेरी येथील आरोग्य केंद्रात असलेले डॉक्टर दीर्घकाळ सुट्टीवर असल्याने तेथील रूग्णांची गैरसोय होत आहे.
मंडणगड तालुक्यातील या तिन्ही जागा रिक्त असून त्या जागा त्वरित भरण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून आमदार संजय कदम यांनी या विषयात लक्ष घालून रिक्त जागा त्वरित भरण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे. (वार्ताहर)