आरोग्य केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:35 IST2021-05-25T04:35:14+5:302021-05-25T04:35:14+5:30

रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद खेड : शहरात सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ३२ जणांनी रक्तदान केले. ...

Health Center | आरोग्य केंद्र

आरोग्य केंद्र

रक्तदान शिबिरास उत्तम प्रतिसाद

खेड : शहरात सामाजिक संस्थेच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. त्यात ३२ जणांनी रक्तदान केले. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कासारे, सचिव सतीश कदम यांच्या पुढाकाराने हे शिबिर घेण्यात आले. शिबिराचे उद्घाटन खेडच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या हस्ते करण्यात आले.

महाविद्यालयातर्फे मदत

राजापूर : शहरातील गोड - दाते कनिष्ठ महाविद्यालयाच्या २००१-०३ च्या बॅचतर्फे सुप्रिया पवार यांनी धारतळे कोरोना केंद्राला सामाजिक बांधिलकीतून साहित्य भेट दिले. मयुरेश चाैगुले यांनी चादरी दिल्या. हे साहित्य ॲड. सुशांत पवार व सूरज पेडणेकर यांनी नुकतेच डाॅ. निखिल परांजपे यांच्याकडे सुपूर्द केले.

मोफत देणार

देवरूख : कोकणासह इतर भागात काेरोनाची औषधे मोफत देण्याचा संकल्प मनसेचे डाॅ. मनोज चव्हाण यांनी केला आहे. या औषधांचे वाटप व डाॅक्टरांसाठी लागणारी विविध किट्स यांचा आरंभ देवरूख येथे करण्यात आला. मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्टचे विश्वस्त डॉ. मनोज चव्हाण यांच्या वतीने किट्स, औषधे वाटप केली जात आहेत.

लसीकरणासाठी शेड

आरवली: संगमेश्वर तालुक्यातील निवे खुर्द प्राथमिक आरोग्य केंद्रात आजूबाजूच्या १६ गावातील ग्रामस्थ लसीकरणासाठी येतात. सकाळी आलेले ग्रामस्थ दुपारपर्यंत उन्हात उभे असतात. त्यांची सोय व्हावी, यासाठी शिवसेनेचे युवा कार्यकर्ते व माजी सरपंच सचिन मांगले यांनी शेड उभारली आहे.

किरबेट येथे सर्वेक्षण मोहीम

देवरूख : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असून, त्यासाठी ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ अभियान राबविण्यात येत आहे. संगमेश्वर तालुक्यातील पंचायत समिती सभापती जया माने यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, घरोघरी जाऊन तपासणी केली जात आहे.

व्यापारी संघटनेतर्फे मदत

देवरूख : संगमेश्वर तालुका लाकूड व्यापारी संघटनेतर्फे कोरोना केंद्रासाठी २० हजार रुपये तसेच मास्क, हॅण्डग्लोज, सॅनिटायझरची मदत तहसीलदार सुहास थोरात यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी अध्यक्ष किरण जाधव, सचिव शेखर खामकर, रमेश पंदेरे आदी उपस्थित होते.

किराणा मालाचे वाटप

देवरूख : दख्खन गावातील गरजू २५ कुटुंबांना उदरनिर्वाहासाठी लागणाऱ्या किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम साखरपा गोवरेवाडीतील ग्रामस्थ, मुंबई तरूण मित्रमंडळ व चेन्नई मंडळ यांच्या सहकार्यातून राबविण्यात आला. गोवरेवाडी ग्रामस्थांच्या उपक्रमाचे सर्व स्तरातून काैतुक करण्यात येत आहे.

तहसीलदारांना निवेदन

दापोली : मागासवर्गीय कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा पदोन्नत्तीमधील आरक्षणासंदर्भात दिनांक ७ मे रोजी २०२१ रोजीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करावा, या मागणीचे निवेदन कोकण विभागप्रमुख व बिरसा क्रांती दल अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांनी तहसीलदारांना दिले आहे.

टॅंकरने पाणीपुरवठा

खेड : तौक्ते चक्रीवादळानंतर सलग चार दिवस झालेल्या पर्जन्यवृष्टीमुळे तालुक्यातील टंचाईग्रस्त गावे व वाड्यांची संख्या स्थिरावलेली असतानाच ऐनवली - बंगालवाडीत पाण्याची टंचाई जाणवत आहे. तेथे टॅंकरने पाणीपुरवठा करण्यास सुरूवात झाल्याने ग्रामस्थांना दिलासा प्राप्त झाला आहे.

गटारे मातीने भरली

चिपळूण : मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असून, चाैपदरीकरणाबरोबर रस्त्याच्या कडेला गटारे बांधण्यात येत आहेत. नुकत्याच झालेल्या चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे गटारांमध्ये माती व चिखल साचला आहे. पावसाळा तोंडावर असून, गटारे वेळीच साफ न झाल्यास सर्वत्र पाणी साचून तळ्याचे स्वरूप येण्याचा धोका आहे.

Web Title: Health Center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.