‘मुख्याधिकारी प्रशिक्षण केंद्र’!
By Admin | Updated: January 3, 2015 00:14 IST2015-01-02T23:11:57+5:302015-01-03T00:14:16+5:30
रत्नागिरी पालिका : अनेक अधिकारी आले अन् गेले...

‘मुख्याधिकारी प्रशिक्षण केंद्र’!
रत्नागिरी : गेल्या वर्षभराच्या काळात रत्नागिरी पालिकेच्या मुख्याधिकारीपदी हंगामी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वर्षभरात अनेक मुख्याधिकारी आले आणि गेले, अशी स्थिती असून रत्नागिरी नगरपालिका ही ‘मुख्याधिकारी प्रशिक्षण केंद्र’ बनल्यासारखी स्थिती असून, शहराच्या विकासकामांवर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. नगरपालिकेला कायमस्वरुपी मुख्याधिकारी कधी मिळणार व अडलेली विकासकामे मार्गस्थ कधी होणार, असा संतप्त सवाल आता नागरिकांतून केला जात आहे.
रत्नागिरी पालिकेत तीन वर्षांपूर्वी सत्तापरिवर्तन झाले. रत्नागिरीकरांनी सेना-भाजपा युतीच्या हाती सत्ता दिली. त्यामुळे शहराच्या विकासाला गती मिळेल, अशी नागरिकांची अपेक्षा होती. सुरूवातीच्या दोन वर्षांच्या काळात विकासाच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न युतीच्या सत्ताधाऱ्यांकडून झाला. मात्र, गेल्या वर्षभराच्या काळात तीन वर्षांसाठी मुख्याधिकारी नियुक्त न झाल्याने त्याचा शहराच्या विकासकामांवर विपरित परिणाम झाला आहे.
तात्पुरत्या स्वरुपात वर्षभराच्या काळात ८ ते १० मुख्याधिकारी बदलून गेले. प्रभारी या पदाची जणू यादीच तयारी झाली. त्यामुळे प्रशासनावरही कोणाचा वचक राहिला नाही. कर्मचाऱ्यांना जाब विचारणाराच कोणी नसल्याने मनमानी कारभार सुरू झाला. राजकीय दबावाचे राजकारणही झाले. कधी दुसऱ्या पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त भार, तर कधी नायब तहसीलदार, जिल्हा प्रकल्प अधिकारी, प्रोबेशन काळ असलेले अधिकारी असा हा वर्षभराचा रत्नागिरी मुख्याधिकारीपदाचा प्रवास सुरू आहे. या काळात दैनंदिन कामकाजाव्यतिरिक्त फार काही घडले, असे दिसून आले नाही.
नागरिकांना अनेक कामांसाठी त्यांच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी मिळविण्यासाठीही ताटकळत राहावे लागत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रत्नागिरीकरांचा याबाबतचा वनवास संपणार कधी, या साऱ्या स्थितीला जबाबदार कोण, यासारखे सवालही आता नागरिकांतून केले जात आहेत. नियमित मुख्याधिकारी नसल्याने नगरसेवकांनाही त्यांच्या प्रभागातील कामांना न्याय मिळवून देण्यात अडचणी येत आहेत. परिणामी नगरसेवकही त्रस्त आहेत. त्यामुळे लवकरात लवकर पालिकेला नियमित मुख्याधिकारी मिळावा, अशी मागणी ॅॅहोत आहे. (प्रतिनिधी)
‘कायम’ची प्रतीक्षा
रत्नागिरी हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. मात्र तेथील पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यालाही अढळ स्थान नसल्याची खंत व्यक्त होत आहे. गेल्या वर्षभरात अनेकवेळा मुख्याधिकारी बदलले, अनेकवेळा हे पद रिक्त राहिले तर काहीवेळा मुख्याधिकारी दीर्घ रजेवर गेले. त्यामुळे विकासकामांचे घोडे तेथेच अडून बसले. अनेक प्रशासकीय कामांचाही खोळंबा होत होता. आता तरी रत्नागिरी पालिकेला कायम मुख्याधिकारी मिळणार का? असा सवाल होत आहे.