पाखाड्यांच्या कामांची डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2016 00:50 IST2016-01-08T00:00:03+5:302016-01-08T00:50:41+5:30

गुहागर नगरपंचायत : शहरात सुरू असलेल्या कामांमध्ये आवश्यक काँक्रीटचा अभाव

Headache of the work of the creek | पाखाड्यांच्या कामांची डोकेदुखी

पाखाड्यांच्या कामांची डोकेदुखी

गुहागर : गुहागर नगरपंचायतीच्यावतीने आपल्या कार्यक्षेत्रात लाखो रुपयांची कामे केली जात आहेत. मात्र, एकाच वेळी सर्व कामांवर लक्ष ठेवणे म्हणजे जिकरीचे बनले आहे. परिणामी शहरातील कीर्तनवाडी मुख्य रस्ता ते गोविंद साटले घरापर्यंतच्या पाखाडीच्या कामात आवश्यक जाडीचा काँक्रीटचा थर टाकण्यात आला नसल्याची बाब नगरपंचायतीच्या निदर्शनास आली आहे, अशा तकलादू कामांमुळे सध्या नगरपंचायत त्रस्त झाली आहे.
गुहागर शहरातील कीर्तनवाडी मुख्य रस्ता ते गोविंद साटले घर अशी रस्ता अनुदानातून २ मीटर रूंद व ६० मीटर लांबीच्या पाखाडीचे काम हाती घेण्यात आले आहे. या पाखाडीसाठी सुमारे २ लाख ८३ हजार इतका निधी उपलब्ध असून, हे काम मोहन पवार यांनी केले आहे. या कामामध्ये प्रथम तीन इंचाचा काँक्रीट थर टाकून त्यावर जांभा दगड असे एस्टिमेंट आहे. प्रत्यक्षात कमी जाडीचा काँक्रीटचा थर टाकून त्यावर जांभा दगड बसवला. त्यामुळे जांभा दगड समांतर रेषेत दिसत नव्हता, म्हणून त्यावर रेती, ग्रीट व सिमेंट मिसळून पाखाडीवर टाकण्यात आले. जांभ्या दगडाच्या खालच्या बाजुच्या काँक्रीटची जाडी आवश्यक प्रमाणात न घेता दगडावर माल काढून ती जाडी दाखवण्याचा प्रयत्न ठेकेदाराने केला आहे.
याबाबत नगरपंचायतीकडे विचारणा केली असता दगडाच्या खाली तीन इंच जाडीचा खडी, रेती मिक्स काँक्रीट थर नसल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले. त्यामुळे बिल काढले नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मात्र, अशा प्रकारच्या निकृष्ट कामामुळे नगरपंचायतच त्रस्त झाली असून, खरोखरच हे काम किती टिकेल, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे, अशा कंत्राटदारांना यापुढे कामे देताना नगरपंचायतीने विचार करावा, असेही बोलले जात आहे.
दरम्यान, या कामाबाबत मुख्याधिकारी प्रसाद शिंंगटे यांच्याजवळ विचारणा केली असता पाखाडीखाली तीन इंच जाडीचा काँक्रीट टाकला नसेल तर त्याप्रमाणे या कामाचे पेमेंट देण्यात येईल. तसेच दगडावर टाकलेला रेतीमाल हा आपल्यालाही पसंत नसल्याची कबुली दिली आहे. दिलेल्या एस्टिमेटप्रमाणे कामे होत नसतील तर खरोखरच विकासकामे दर्जेदार होतात का? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (प्रतिनिधी)

विकासकामांना गती : दर्जा ढासळला
गुहागर नगरपंचायत अस्तित्त्वात आल्यानंतर याठिकाणी विविध विकासकामांना चालना मिळाली आहे. नगरपंचायतीला मिळणाऱ्या निधीतून विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, या कामांचा दर्जा राखला जात नसल्याने निधीचा अपव्यय होत असल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Headache of the work of the creek

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.