शस्त्रक्रियेसाठी त्यांनी दिला मदतीचा हात
By Admin | Updated: August 13, 2015 22:54 IST2015-08-13T22:54:13+5:302015-08-13T22:54:13+5:30
कुणबी कर्मचारी सेवा संघ : भाजी विक्रेत्या महिलेला मदतीचा हात देण्याचे आवाहन

शस्त्रक्रियेसाठी त्यांनी दिला मदतीचा हात
रत्नागिरी : भाजीची विक्री करून कुटुंबाची गुजराण करणाऱ्या भाजीविक्रेत्या महिलेला कुणबी कर्र्मचारी सेवा संघाने आर्थिक हात दिल्याने तिच्या पायावरील शस्त्रक्रियेतील आर्थिक अडसर दूर झाला आहे.
समाजातील निराधार व्यक्तींना आधार देण्याचे कार्य गेल्या सात - आठ वर्षांपासून कुणबी कर्मचारी सेवा संघ करत आहे. शहरातील जुने भाजी मार्केट येथील साधना जनार्दन चोरगे या भाजी विक्री करून त्यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करतात. मात्र, त्यांच्या पायाचे दुखणे वाढल्याने त्यांना येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे गरजेचे आहे, त्यासाठी ‘बी पॉझिटीव्ह’ गटाचे रक्तही त्यांना मिळणे आवश्यक आहे. परंतु, घर चालविणारी कुटुंबप्रमुखच जाग्यावर बसल्याने आर्थिक भार कोण उचलणार, ही चिंता त्यांच्या घरच्यांना सतावत होती.
अखेर ही गोष्ट कुणबी कर्मचारी सेवा संघाचे हितचिंतक सूर्यकांत (बावा) चौगुले यांनी संघाचे उपाध्यक्ष अनंत नैकर यांच्या कानावर घालताच प्रसंगाचे गांभीर्य ओळखून नैकर यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना याची कल्पना दिली. पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन चोरगे यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला.
जिल्हा रूग्णालयात जाऊन संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चोरगे यांची आस्थेने विचारपूस करून, त्यांच्या कुटुंबियांकडे ही मदत सुपूर्द केली. यावेळी कुणबी सेवा संघाचे अध्यक्ष सुरेश कळंबटे, उपाध्यक्ष अनंत नैकर, कोषाध्यक्ष मोहन बागवे, बावा चौगुले, दत्ता नागले, रमेश पालकर, अरूण कळंबटे आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. रश्मी आठल्ये उपस्थित होत्या. समाजातील निराधार व्यक्तींना आधार देण्याचे कार्य कुणबी कर्मचारी सेवा संघ गेली चार वर्षे करीत असून या कार्यबद्दल धन्यवाद देण्यात आले. (प्रतिनिधी)