बालिकेच्या उपचारांकरिता मदतीचा हात
By Admin | Updated: September 26, 2016 23:15 IST2016-09-26T22:25:52+5:302016-09-26T23:15:23+5:30
चाईल्ड लाईन : देवरूख येथील बालिकेसाठी मदतीचे आवाहन

बालिकेच्या उपचारांकरिता मदतीचा हात
रत्नागिरी : एम. एस. नाईक फाऊंडेशन संचलित, रत्नागिरी चाईल्ड लाईन १०९८ या संस्थेने जान्हवी मिलिंद जंगम (२ वर्षे, देवरूख - बोटकेवाडी, ता. संगमेश्वर) या मुलीच्या वैद्यकीय उपचाराकरिता मदतीचा हात दिल्याने तिच्यावर यशस्वी उपचार करणे शक्य झाले.
चाईल्ड लाईनला मिळालेल्या माहितीवरून मुलीची चौकशी केली असता मुलीच्या उजव्या डोळ्याला कॅन्सर झाल्याने मुलीवर कोल्हापूर येथील अस्टर आधार हॉस्पिटल येथे उपचार सुरु असून, या मुलीवर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी ७० हजार रुपये एवढा खर्च डॉक्टरांमार्फत देण्यात आला असल्याचे पालकांकडून समजले. परंतु मुलीच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने एवढा खर्च करणे पालकांना शक्य नसल्याने त्यांच्याकडून चाईल्ड लाईनला मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार मुलीच्या पालकांना मुख्यमंत्री निधीतून वैद्यकीय मदत मिळवून देण्याकरिता महेश जाधव यांच्या सहकार्याने ३५००० रुपयांचा निधी मंजूर करुन देण्यात आला. उर्वरित ३५ हजार जमा करण्याकरिता मुलीच्या वडिलांनी मदतीचे आवाहन केले. मुलीची कौटुंबिक परिस्थिती लक्षात घेऊन चाईल्ड लाईनने व्हॉट्सअॅपच्या माध्यमाद्वारे सामाजिक कार्य करणाऱ्या दानशुरांना मुलीच्या उपचारांकरिता आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला रत्नागिरीकरांनी प्रतिसाद दिला.
संपूर्ण रक्कम चाईल्ड लाईन केंद्रावर मुलीचे वडील मिलिंद जंगम यांच्याकडे देणगीदारांच्या उपस्थितीत देण्यात आली. यावेळी एम. एस. नाईक प्रशालेचे सेक्रेटरी अश्फाक नाईक, केंद्रसमन्वयक प्राची जाधव, टीम मेंबर त्रिपाली कोळंबेकर, नितीश शेट्ये, ओंकार नागवेकर, सतीश महाडिक, स्वयंसेवक अभिषेक भुते उपस्थित होते. एम. एस. नाईक फाऊंडेशनचे संचालक मोहंमद सिद्दीक नाईक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)