गुहागरातील अपंगाचा भावंडांना आधार

By Admin | Updated: July 16, 2015 00:32 IST2015-07-16T00:32:21+5:302015-07-16T00:32:21+5:30

समीर पाटील : पोलिओतून सावरला अन् रिक्षा व्यावसायिक झाला...

Handicapped siblings in Guhagar | गुहागरातील अपंगाचा भावंडांना आधार

गुहागरातील अपंगाचा भावंडांना आधार

मंदार गोयथळे -असगोली -घरची परिस्थिती बेताची. त्यातच बालपणी पोलिओच्या आघाताने जगण्याची उमेदच मोडली. पोलिओसारख्या आजारपणातच दोन्ही पाय गमावूनही त्याने केवळ जिद्दीच्या जोरावर रिक्षा व्यवसायात उडी घेतली. यावरच न थांबता दोन्ही लहान भावंडांना स्वत:च्या पायावर उभे केले, ही कथा आहे ती गुहागर तालुक्यातील तळवली येथील समीर पाटील या तरुणाची!
मूळ गाव अडूर - कोंडकारुळ येथील ३२ वर्षीय समीर पाटीलची कहाणी फारच दु:खदायक आहे. घरात अठराविश्व दारिद्र्य. असे असतानाच एक वर्ष पूर्ण होण्याआधीच समीरला पोलिओ झाला. ही घटना इतकी विचित्र होती की, पोलिओमध्ये अपंगत्व आल्याने तो आपले दोन्ही पाय गमावून बसला. आपण इतरांप्रमाणे उभे राहू शकणार नाही, याची कल्पना त्यावेळी त्याच्या बालमनाला आली नाही. मात्र, या घटनेनंतर त्याचे तळवली येथील दोन्ही मामा विनोद मयेकर व विवेक मयेकर हे त्याचे दोन पाय बनले.
समीरच्या मामांनी त्याला न्यू इंग्लिश स्कूल, तळवली येथे दहावीपर्यंतचे शिक्षण दिले. शरीराने अपंग असला तरी समीर मनाने खंबीर आहे. त्यामुळे त्याने अनेक मित्र जोडले. त्यापैकी ज्या मित्राने त्याला गाडी चालवण्याचे धडे दिले, त्या मित्राचे नाव तो आज फार कौतुकाने आणि कृतज्ञतेने आवर्जुन घेतो. अरुण कांबळे या मित्राने त्याला ड्रायव्हिंगचे धडे दिले. अपंग असूनही समीरने गाडी चालवण्याचे तंत्र आत्मसात करुन घेतले.भावंडात सर्वांत मोठा असल्याने घरची सर्वच जबाबदारी समीरवर होती. कुटुंबाच्या रोजीरोटीचा प्रश्नही समोर होता. तो सोडवण्यासाठी समीरने वाहन घेण्याचे ठरवले, यासाठी सर्वात मोठी अडचण भासत होती ती पैशांची! यावेळी पुन्हा एकदा मामांनी आधार देत सर्वतोपरी मदत केली. मामांनी समीरला रिक्षा घेऊन दिली. इथून समीरचा रिक्षा व्यवसाय सुरु झाला. कालांतराने त्याने अ‍ॅपे रिक्षा खरेदी केली. आता तर त्याचा या व्यवसायात इतका जमा बसलाय की, सध्या टाटा आयशर हे वाहन खरेदी करत त्याने या व्यवसायात भरारी घेतली आहे.
तळवली येथे मामाकडे राहून समीर हा व्यवसाय करत आहे. समीरने दोन्ही लहान भावंडांनीही वाहन चालवण्याची कला आत्मसात केली आहे. समीरच्या या धडाडीमुळे आज त्याचा एक भाऊ एस. टी. महामंडळात चालक म्हणून नोकरी करत आहे.

Web Title: Handicapped siblings in Guhagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.